बारावी परीक्षेत सलग तेरा वर्षे काेकण पहिला; यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा राज्यात प्रथम क्रमांक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 12:32 PM2024-05-22T12:32:43+5:302024-05-22T12:33:03+5:30
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १.५ टक्का वाढला असून, यावर्षीही सिंधुदुर्ग जिल्हा अव्वल राहिला आहे. कोकण विभागात विज्ञान शाखेचा सर्वाधिक (९८.६१) टक्के निकाल लागला आहे.
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. काेकण मंडळाचा एकूण निकाल ९७.५१ टक्के लागला असून, राज्यातील नऊ मंडळांमध्ये कोकण मंडळाने सलग १३ व्या वर्षी राज्यात अव्वल स्थान मिळविले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १.५ टक्का वाढला असून, यावर्षीही सिंधुदुर्ग जिल्हा अव्वल राहिला आहे. कोकण विभागात विज्ञान शाखेचा सर्वाधिक (९८.६१) टक्के निकाल लागला आहे.
प्रात्यक्षिकचे गुण ऑनलाइन घेतल्यामुळे निकाल लवकर लागला
पुणे : राज्य मंडळाने गतवर्षीपेक्षा लवकर बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यंदा प्रात्यक्षिक आणि अंतर्गत परीक्षेचे गुण ओएमआर शीटवर न घेता ऑनलाइन पाेर्टलच्या माध्यमातून घेतल्यामुळे परीक्षेचा निकाल लवकर जाहीर हाेण्यास अत्यंत चांगला उपयाेग झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावी यांनी दिली. यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी नाउमेद होऊ नये, असेही त्यांनी सांगितले.
गुणपडताळणीसाठी २२ मेपासून अर्ज
गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करता येईल. गुणपडताळणी तसेच उत्तरपत्रिका छायाप्रत मागविण्यासाठी २२ मे ते ५ जून पर्यंत ऑनलाइन शुल्क भरून अर्ज करता येईल.
विभागीय स्तरावर समुपदेशक
इयत्ता दहावी-बारावी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मानसिक दडपण अथवा नैराश्य येण्याची शक्यता असते. त्यामुळे बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील आठ दिवस मंडळातर्फे समुपदेशन सेवा सुरू केली आहे. विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी सेवेचा फायदा होणार आहे.