पैसे घेतले, पण उद्योगांना जागा देण्यास टाळाटाळ, यंत्रणांच्या डोळ्यावर झापडे, अधिका-यांची मानसिकताही मागास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 03:21 AM2017-10-23T03:21:56+5:302017-10-23T03:23:25+5:30
राज्याच्या विकासात उद्योग क्षेत्राचा मोठा वाटा असतो. उद्योगांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळतेच; पण अनेकांना रोजगार मिळतो. राज्याच्या समृद्धीत वाढ करणारे हे उद्योजक, कामगार अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. हे सर्व यंत्रणांना दिसूनही त्यांनी झोपेचे सोंग घेतलेले आहे.
-पंकज पाटील, अंबरनाथ
राज्याच्या विकासात उद्योग क्षेत्राचा मोठा वाटा असतो. उद्योगांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळतेच; पण अनेकांना रोजगार मिळतो. राज्याच्या समृद्धीत वाढ करणारे हे उद्योजक, कामगार अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. हे सर्व यंत्रणांना दिसूनही त्यांनी झोपेचे सोंग घेतलेले आहे. आपल्याकडे उद्योगांच्या विकासाच्या फक्त गप्पा मारल्या जातात आणि गुजरातशी तुलना होते. पण धोरणे, ती राबवणारी अधिका-यांची मानसिकता बदलत नाही, याचे हे जिवंत उदाहरण.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेक इन इंडियाचा नारा देत आहेत. त्यांच्या सूरात राज्य सरकारही सूर मिसळून उद्योगाचे स्वप्न दाखवत आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीत मेक इन इंडिया मोलाची कामगिरी बजावेल असा विश्वास व्यक्त करत आहे. मात्र, राज्यातील उद्योग कुठल्या अडचणींना सामोरे जात आहे हे कुणीच लक्षात घेत नाही. केवळ उद्योग नव्हे तर उद्योजक, कामगार हेही अडचणीत सापडले आहेत.
अंबरनाथमधील आनंदनगर औद्योगिक वसाहतीसह इतर औद्योगिक वसाहतींचा विस्तार हा जलद गतीने होत आहे. मात्र या ठिकाणी काम करणाºया कामगारांवर असुविधांचा सामना करण्याची वेळ आली आहे. औद्योगिक पट्टा वाढल्याने अनेक कंपन्या या रेल्वे स्थानकापासून लांब अंतरावर आहेत. मात्र त्या ठिकाणी पोहचण्यासाठी कामगारांना कोणतीच सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नाही. ज्या पध्दतीने कामगारांची अवस्था बिकट आहे त्याप्रमाणे एमआयडीसीने नव्याने उभारलेल्या पाले एमआयडीसी क्षेत्रातील उद्योजकांची अवस्था बिकट करून ठेवली आहे. उद्योजकांनी या ठिकाणी कंपनीसाठी जागा घेतलेली असतानाही त्या कारखानदारांना अद्याप त्यांची जागाच ताब्यात दिलेली नाही. पैसे घेतले पण जागा मिळत नाही म्हणून उद्योजक आता एमआयडीसीच्या नावाने खडे फोडत आहेत.
अंबरनाथमधील आनंदनगर एमआयडीसी ही जिल्ह्यातील सर्वात मोठी एमआयडीसी म्हणून ओळखली जाते. या सोबत अंबरनाथमध्ये चिखलोली एमआयडीसी, वडोल एमआयडीसी यासह अंबरनाथ आयुध निर्माणी कारखान्याचाही समावेश आहे. या ठिकाणी अनेक उद्योजक विसावल्याने अंबरनाथ शहरात कामगारांची मोठी वसाहत निर्माण झाली. कामगारांची वस्ती असलेले शहर म्हणून अंबरनाथ नावारुपाला आले. मात्र ज्या शहराची ओळख कामगारांमुळे आहे त्या शहरात कामगारांसाठी कोणत्या सुविधा आहेत याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. अंबरनाथमधील कारखान्यात काम करणाºया कामगारांना आज मोठ्या प्रमणात समास्यांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. अंबरनाथमध्ये सकाळी कामावर जाताना वाहतुकीची कोणतीच सुविधा नसल्याने या कामगारांना पायपीट करत जावे लागते. मासिक वेतन कमी असल्याने अनेक कामगारांना कामावर जाण्यासाठी रिक्षा परवडत नाही. जाण्यासाठी २० आणि येण्यासाठी २० असे एकूण ४० रुपये खर्च करण्याची क्षमता नसल्याने कामगार हे ४ ते ५ किलोमीटरचे अंतर पायी कापतात. रोज तास-सव्वातास चालतात. अंबरनाथ स्थानकापासून एमआयडीसीसाठी स्वतंत्र बससेवा उपलब्ध करुन देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. परंतु अद्यापही सेवा सुरू झालेली नाही. शेकडो कामगार एमआयडीसीत कामानिमित्त चालत जातात हे माहित असूनही त्यावर कार्यवाही होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एमआयडीसीचे अधिकारी किंवा पालिकेचे अधिकारीही बससेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करत नाहीत. येथील कामगारांना वाहतूक सुविधा पुरवण्यासाठी कुणी वालीच शिल्लक राहिलेला नाही. कामगारांची संख्या एवढी मोठी आहे की त्यांना कामावर जाताना किंवा कंपनी सुटल्यावर रिक्षाही मिळत नाहीत. येथील कामगारांना रिक्षासाठी अर्धा- अर्धा तास वाट पाहावी लागते.
घातक रासायनिक
कचºयाचा त्रास
अंबरनाथच्या औद्योगिक पट्टयात निर्माण होणारा कचरा उचलण्याची कोणतीच यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे या परिसरात कचरा उघड्यावर पडून राहत आहे. त्या कचºयाचा त्रास आता कामगारांना सहन करावा लागत आहे. दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. कचºयामुळे परिसर अस्वच्छ झाला आहे. या सोबत एमआयडीसीत घातक रासायनिक कचºयाचाही त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. एमआयडीसीमधील काही कंपन्या या उघड्यावरच रासायनिक कचरा टाकत असल्याने त्याचा त्रास कामगारांसह स्थानिक नागरिकांनाही सहन करावा लागत आहे. एमआयडीसी परिसरात असलेल्या चिखलोली धरणाच्या सुरक्षेलादेखील त्यामुळे धक्का बसत आहे. काही रासायनिक कचरा थेट धरणात टाकण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
महिलांच्या सुरक्षिततेचा
प्रश्न ऐरणीवर
आनंदनगर एमआयडीसीमध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे. या महिलांना देखील कोणतीच वाहतुकीची सुविधा नाही. कंपनी सुटल्यावर या महिलाही ५ किलोमीटर पायपीट करत घर गाठतात. काही महिला सायंकाळी ७ वाजता सुटत असल्याने त्यांना घर गाठताना अंधाराचा सामना करावा लागतो. एमआयडीसी भागातील पथदिवे बंद राहत असल्याने या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एमआयडीसीतील अनेक रस्ते हे सामसूम असल्याने त्या रस्त्यावरून चालणे महिलांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने धोकादायक ठरत आहेत.
रिक्षाचालकांची मुजोरी : रिक्षाचालकांची मुजोरीही कामगारांना त्रासदायक झाली आहे. खाजगी बस सेवा सुरू करणाºयांनाही रिक्षाचालक तग धरू देत नसल्याने त्याचा थेट फटका हा कामगाराला बसतो. एसटी महामंडळाची बससेवा सुरू करण्यातही रिक्षाचालक अडथळा निर्माण करत असल्याने ही बससेवा देखील सुरू होत नाही. या सर्व समस्यांवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यात अधिकाºयांना अपयश आले आहे. रिक्षाचालक इतर वाहतूक सुविधा निर्माण करून देत नसल्याने येथील कामगारांना केवळ रिक्षांवरच अवलंवून रहावे लागते. त्यातही रिक्षामध्ये नंबर लागण्यासाठी विलंब होत असल्याने अनेक कामगार आता पायी घरी जाणचे पसंत करतात.
शिकाऊ चालकांमुळे धोका
एमआयडीसीच्या रस्त्यांवर अनेक नागरिक गाडी चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे या नवशिख्या वाहनचालकांचा धोका देखील या रस्त्यावरुन जाणाºया कामगारांना होतो. शिकाऊ वाहनचालकांचा गाडी चालवताना नियंत्रण सुटून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. कंपनी सुटल्यावर मोठ्या प्रमाणात कामगारांची वर्दळ रस्त्यावर असते. त्या ठिकाणी शिकाऊ वाहनचालकांना वाहन चालवण्यावर बंदी घालण्याची गरज व्यक्त होत आहे.