विधानसभेत ‘टॉपर’ झाले ‘काठावर पास’
By admin | Published: October 23, 2014 04:05 AM2014-10-23T04:05:33+5:302014-10-23T04:05:33+5:30
विधानसभा निवडणुकीतील निकालांनी अनेक दिग्गजांची मक्तेदारी मोडीत काढली. गेल्या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने निवडून येणाऱ्या आमदारांना विजय मिळविताना मोठा संघर्ष करावा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
गौरीशंकर घाळे, मुंबई
विधानसभा निवडणुकीतील निकालांनी अनेक दिग्गजांची मक्तेदारी मोडीत काढली. गेल्या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने निवडून येणाऱ्या आमदारांना विजय मिळविताना मोठा संघर्ष करावा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मुंबई शहरातून २००९ साली काँग्रेसचे कालिदास कोळंबकर सर्वाधिक मतांच्या फरकाने विजयी झाले होते. वडाळ्यातून कोळंबकरांना तब्बल ३०,०३० चे मताधिक्य मिळाले होते. यंदा मात्र कोळंबकरांना विजयासाठी संघर्ष करावा लागला. अवघ्या ८०० मतांनी ते कसेबसे विजयी झाले. तर सायन कोळीवाड्यातून १८ हजारांच्या मताधिक्याने विजयी झालेल्या जगन्नाथ शेट्टी यांचा भाजपा उमेदवार कॅ. तमिल सेल्वन यांनी पराभव केला. मुंबादेवीतून काँग्रेस उमेदवार अमिन पटेल यांनी आपली जागा राखली असली तरी त्यांचे मताधिक्य १६ हजारांवरून थेट ८ हजारांवर घसरले.
मुंबई उपनगरातील चांदिवली मतदारसंघातून नसीम खान ३३ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. मुंबई उपनगरातील २६ मतदारसंघांतील हे सर्वाधिक मताधिक्य होते.
यंदा खान यांनी २९ हजारांचे मताधिक्य राखले असले तरी ते आठव्या स्थानवर आहेत. तर गेल्या वेळी दुसऱ्या क्रमांकावरील अशोक जाधव २४ हजार मतांनी पराभूत झाले. भांडुप येथील मनसे नेता शिशिर शिंदे यांचे मताधिक्य ३०९४३ होते. तिसऱ्या क्रमांकाचा मोठा
विजय मिळविणारे शिंदे यंदा पराभूत झाले.
मालाड पश्चिमेतून काँग्रेसच्या अस्लम शेख यांनी आपली जागा राखली असली तरी २७ हजारांचे मताधिक्य २३०३ वर घसरले. विक्रोळीत मनसेचे मंगेश सांगळे वीस हजारांच्या मताधिक्याने विजयी ठरले होते. यंदा मात्र त्यांना शिवसेनेच्या सुनील राउतांकडून २५ हजारांहून अधिक मतांनी पराभव स्वीकारावा लागला. (प्रतिनिधी)