‘यूपी’नंतर सर्वाधिक बेघर महाराष्ट्रात !
By admin | Published: December 5, 2015 12:36 AM2015-12-05T00:36:16+5:302015-12-05T00:36:16+5:30
देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात (यूपी) सर्वाधिक बेघर आहेत. उत्तर प्रदेशापाठोपाठ विकसित म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात सर्वाधिक बेघर आहेत.
नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात (यूपी) सर्वाधिक बेघर आहेत. उत्तर प्रदेशापाठोपाठ विकसित म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात सर्वाधिक बेघर आहेत. चार वर्षांपर्यंत देशात २ लाख ५६ हजार ८९६ बेघर कुटुंबे होती. विशेष म्हणजे विकसित राज्यांत बेघरांची संख्या तुलनेने अधिक आहे.
राज्यसभा खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल गृह व नागरी गरिबी निर्मूलन राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. गोठवणाऱ्या थंडीत बेघर असलेल्यांचे मृत्यू आणि अशा लोकांच्या आश्रयासाठी सरकारने कोणती पावले उचलली? याबाबत दर्डा यांनी सविस्तर प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना सुप्रियो यांनी सांगितले की, २०११च्या जनगणना आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशात ४१,२२७ कुटुंबे बेघर होती. महाराष्ट्रात ही संख्या ३२,६६४ एवढी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य गुजरातमध्ये २३,९८७ कुटुंबांच्या डोक्यावर छत नव्हते; तर अविभाजित आंध्र प्रदेशातही चार वर्षांपूर्वी २३,३७६ कुटुंबे छत नसल्याने उघड्यावर रात्र काढत होती. शहरातील बेघर लोकांना आश्रय देणे ही राज्यांची जबाबदारी आहे. अर्थात, राज्य सरकारांद्वारे अशा लोकांसाठी ‘निवारे’ उभारण्यासाठी गृह व नागरी गरिबी निर्मूलन मंत्रालयाकडून राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (एनयूएलएम) राबवले जात आहे. याचप्रकारे शहरी बेघरांसाठी ‘रैन बसेरा(एसयूएच)’ नामक योजना राबवली जात आहे. यात पायाभूत सुविधा आणि स्थायी आश्रय दिला जातो. राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते, असेही त्यांनी सांगितले.
एनयूएलएमअंतर्गत सर्वाधिक १२९ ‘निवारे’ मध्य प्रदेशात उभारण्यात आले आहेत. तामिळनाडूत ९५, उत्तर प्रदेशात ७३, बिहारात ४८, प. बंगालमध्ये ४५ तर महाराष्ट्रात बेघरांसाठी १३ ‘निवारे’ उभारण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)