'टोरेस'ची राज्यभर फसवणूक साखळी; आर्थिक गुन्हे शाखेचे सहा ठिकाणी सर्च ऑपरेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 07:47 IST2025-01-10T07:47:17+5:302025-01-10T07:47:50+5:30
घर, कार्यालयांची झाडाझडती, कोट्यवधी रुपये जप्त

'टोरेस'ची राज्यभर फसवणूक साखळी; आर्थिक गुन्हे शाखेचे सहा ठिकाणी सर्च ऑपरेशन
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : टोरेसचे फसवणूक जाळे राज्यभरात पसरल्याचे स्पष्ट होत आहे. कोल्हापूरच्या ८६ जणांनी मुंबई पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली आहे. दुसरीकडे गुरुवारी सकाळपासून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून मुंबईसह ठाण्यात सर्च ऑपरेशन राबवून रोख रकमेसह कागदपत्रे, लॅपटॉप, असा ऐवज जप्त करण्यास सुरुवात केली.
कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या एका महिला एजंटने टोरेसच्या ऑफरमध्ये दहा हजार रुपये गुंतवले. नंतर तिने कोल्हापूरमधील नातेवाइक आणि मित्रमंडळीसह ८६ जणांची साखळी तयार करून त्यांनाही गुंतवणूक करण्यास भाग पाडले. तेही तीन दिवसांपासून शिवाजी पार्क पोलिस ठाण्याबाहेर तळ ठोकून आहेत. राज्याच्या विविध भागांतील नागरिक तक्रारी घेऊन येत असल्याने टोरेसने राज्यभरातील गुंतवणूकदारांना गंडा घातल्याचे स्पष्ट होत आहे.
घर, कार्यालयांची झाडाझडती
- मुंबई पोलिसांनी गुरुवारी सकाळपासून दादर, गिरगाव, ग्रँट रोड, एन एन जोशी येथील टोरेसच्या कार्यालयासह आरोपींच्या कुलाबा आणि डोंबिवलीतील घरांतही सर्च ऑपरेशन राबवले.
- अटकेतील जनरल मॅनेजर तानिया कसातोवा, भारतीय वंशाची रशियन नागरिक असलेली स्टोअर मॅनेजर व्हॅलेंटिना गणेश कुमार यांच्या डोंबिवलीतील घरांची झडती घेण्यात आली. तानिया (५२) हिच्या घरातून रोकड जप्त करण्यात आली आहे. सलग दुसऱ्या दिवशी अभिषेक गुप्ताकडे चौकशी सुरू आहे. या कारवाईत दोन ते तीन कोटींची रोकड जप्त केल्याचे स्पष्ट होत आहे.
नवी मुंबईत तक्रारदारांची संख्या दोनशेहून अधिक; एपीएमसी, आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव
- गुंतवणुकीच्या माध्यमातून फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या ‘टोरेस’विरोधात दोनशेच्या वर तक्रारदारांनी पोलिसांशी संपर्क साधला आहे. एपीएमसी व आर्थिक गुन्हे शाखेकडे गुंतवणूकदार धाव घेत आहेत. येत्या काळात तक्रारदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच फसवणूक झालेल्या रकमेचा आकडाही वाढणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
- गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात टोरेसच्याआडून फसवी योजना चालवणाऱ्या प्लॅटिनम हर्न कंपनीच्या प्रमुखांवर गुन्हा दाखल झाला आहे. प्रकार उघडकीस आल्यापासून अद्यापपर्यंत तीन दिवसांत दोनशेहून अधिक तक्रारदार समोर आले आहेत. आर्थिक गुन्हे शाखा व एपीएमसी पोलिस यांच्याकडून त्यांच्या तक्रारी नोंद करून या प्रकरणात एकूण किती कोटींची फसवणूक झाली आहे, याचा शोध घेतला जात आहे.
- नागरिकांना गळाला लावण्यासाठी टोरेस ज्वेलर्सचा आधार घेतला होता. प्रथम नागरिकांना दागिन्यांची माहिती देऊन ते खरेदी करणाऱ्यांना गुंतवणुकीच्या योजना सांगून नफ्याचे आमिष दाखवले जात होते. त्यासाठी ठिकठिकाणी सेमिनारसुद्धा घेतले जात होते. गुंतवणूक करणाऱ्यांचा आकडा हजारोंच्या घरात असण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत तीन कोटीहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. रोख रक्कमेसह मोझानाईट भासवून वितरित केलेले खडेही हाती लागले. टोरेसने घर, वाहने आणि अन्य महागड्या वस्तू बक्षीस म्हणून जाहीर केल्या होत्या. त्याबाबतची कागदपत्रेही सापडली. या कागदपत्रांवरून कंपनीने आतापर्यंत १५ वाहने बक्षीस म्हणून वाटली. टोरेसच्या शोरुममधून खडे हस्तगत करण्यात आले आहेत.
- संग्रामसिंग निशाणदार, पोलिस उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा