रुग्णवाहिकेअभावी बाळंतिणीला यातना
By Admin | Published: June 13, 2016 03:29 AM2016-06-13T03:29:49+5:302016-06-13T03:29:49+5:30
११ जून रोजी जन्मलेल्या अर्भकाला वैद्यकीय उपचारासाठी आगरच्या उप जिल्हा रुग्णालयात हलविणे अत्यावश्यक होते.
अनिरुद्ध पाटील,
डहाणू/बोर्डी- घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवार, ११ जून रोजी जन्मलेल्या अर्भकाला वैद्यकीय उपचारासाठी आगरच्या उप जिल्हा रुग्णालयात हलविणे अत्यावश्यक होते. मात्र या रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने वाहन उपलब्ध होईपर्यंत बाळ-बाळंतींणीला असह्या यातना सोसाव्या लागल्या.
घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत खुनवडे गावच्या शंकरपाडा या आदिवासी पाड्यावरील गीता सतीश दादोडा या गर्भवतीला शनिवारी प्रसूती वेदना सुरू झाल्या. या बाबत तिच्या कुटुंबीयांनी आशा कर्मचाऱ्यांस कळविले. मात्र या प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने गीताला खाजगी वाहनातून घोलवड आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. रात्री ८.२० वाजता तिची प्रसूती झाल्यानंतर नवजात अर्भक रडले नाही. आॅक्सीजनच्या कमतरतेमुळे शरीरही निळसर पडू लागल्याने बाळ-बाळंतणीला अधिक उपचारासाठी आगर येथील उप जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. परंतु रुग्णवाहिका बंद असल्याने खाजगी वाहन उपलब्ध करण्याविषयी दादोडा कुटुंबीयांना सांगण्यात आले. रात्रीची वेळ आणि परिसरात पाऊस असल्याने तासभर फिरूनही वाहन मिळाले नाही. १०८ या हेल्पलाईन क्र मांकाचीही मदत मिळाली नाही. अखेर आशागड केंद्राची रुग्णवाहिका आल्यानंतर अनेक तासांची प्रतीक्षा संपली आणि संबंधितांना हलविण्यात आले. हा कालावधी बाल-बाळंतीण, आणि वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सत्वपरीक्षेचा ठरला.
>इथे सगळ्यांचीच बोंब!
इंडियन पब्लिक हेल्थ स्टँडर्डनुसार आदिवासी भागात ३० हजार लोकसंख्येकरिता प्राथमिक केंद्र तर, पाच हजार लोकसंख्येसाठी उपकेंद्र असणे आवश्यक आहे. त्यानुसार दोन एमबीबीएस, एक बीएएमएस, डॉक्टर, सहा खाटा, रुग्णवाहिका असणे क्र मप्राप्त आहे. या प्रा. आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिक सतत नादुरु स्त असते. रुग्णवाहिकाचालक गेल्या सुमारे चार वर्षांपासून जिल्हा परिषद सभापतींच्या वाहनावर कार्यरत आहे. त्यामुळे रुग्णवाहिकी खरोखर बंद आहे की, बंद पाडली गेली आहे असा प्रश्न जनतेला पडला आहे.