लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
By Admin | Published: July 18, 2016 04:55 AM2016-07-18T04:55:26+5:302016-07-18T04:55:26+5:30
एखाद्या चित्रपटातील नायकाप्रमाणे त्याने एका अल्पवयीन मुलीला गडगंज संपत्तीचे आमिष दाखवले.
ठाणे : एखाद्या चित्रपटातील नायकाप्रमाणे त्याने एका अल्पवयीन मुलीला गडगंज संपत्तीचे आमिष दाखवले. नंतर, सलगी करून पळवून नेले. काही काळ पत्नी म्हणून नांदवले. मात्र, ती गरोदर राहिल्यानंतर तिला आईवडिलांकडे आणून सोडणाऱ्या अहमद नाशीर खान उर्फ राजू (२०) याला वागळे इस्टेट पोलिसांनी अंकलेश्वर (गुजरात) येथून शनिवारी अटक केली आहे.
मुंबईच्या कुर्ला, कलिना भागात राहणाऱ्या राजूची इंदिरानगर भागात राहणाऱ्या या १६ वर्षीय मुलीशी भवानीनगर गार्डन (वागळे इस्टेट) येथे ओळख झाली. त्याने तिच्याबरोबर प्रेमाचे नाटकही रंगवले. आपल्याकडे मोठी संपत्ती आहे, दागिने, पैसेही आहेत, असे फोनवरूनच सांगून त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. तुला सुखात ठेवीन, अशी बतावणी करीत तिला कर्जतजवळील वांगणी येथे पळवून नेले. तिथे दोन महिन्यांच्या कालावधीत तिच्यावर त्याने लैंगिक अत्याचारही केले. गेल्या ११ महिन्यांपासून ते २५ मे २०१६ या कालावधीत हा प्रकार सुरू होता. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी नोंदवली होती, पण शोध लागत नव्हता. अखेर, ती गरोदर राहिल्यानंतर त्याने इंदिरानगरमधून दिवा भागात वास्तव्यासाठी आलेल्या तिच्या आईवडिलांकडे तिला आणून सोडले. लग्नालाही नकार दिला आणि तेथून पळ काढला. या प्रकरणी लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, बलात्कार, अपहरण आदी कलमांखाली १५ जुलै रोजी तक्रार दाखल होताच उपनिरीक्षक नितीन बाबर, जमादार नारायण तायडे यांच्या पथकाने त्याला अटक केली. ठाणे न्यायालयाने त्याला २८ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस निरीक्षक एस.एन. वाघ या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)