महिलांवरील अत्याचार रोखता येणार नाहीत - आर.आर.पाटील
By admin | Published: June 11, 2014 12:32 PM2014-06-11T12:32:03+5:302014-06-11T13:05:59+5:30
प्रत्येक घरात पोलिस तैनात केला तरीही महिलांवरील अत्याचार रोखता येणार नाहीत अशा शब्दांत गृहमंत्री आर. आर.पाटील यांनी हतबलता व्यक्त केली.
Next
>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ११ - प्रत्येक घरात पोलिस तैनात केला तरीही महिलांवरील अत्याचार रोखता येणार नाहीत अशा शब्दांत गृहमंत्री आर. आर.पाटील यांनी हतबलता व्यक्त केली. विधान परिषदेत महिलांवरील अत्याचारांबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना पाटील यांनी ही माहिती दिली. जातीयवाद महिलांवरील वाढत्या अत्याचाराचे प्रमुख कारण असून नैतिक घसरणीमुळे, जाहिराती, अश्लील चित्रे यांमुळेही बलात्कारांचे प्रमाण वाढले असल्याचेही त्यांनी सांगितले.
अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात महिलावरील अत्याचारांचे प्रमाण कमी असल्याचे सांगत उत्तर प्रदेशात महिलांवर सर्वात जास्त अत्याचार होतात, असे पाटील म्हणाले. ६ टक्के बलात्कार हे वडील किंवा भावाकडून, ४२टक्के बलात्कार ओळखीच्या लोकांकडून, ४० टक्के बलात्कार हे लग्नाचे आमिष दाखवून केले जात असल्याचे ते म्हणाले. अनोळखी लोकांकाडून होणा-या बलात्काराचे प्रमाण कमी असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी करण्यात येणा-या उपाययोजनांचीही त्यांनी माहिती दिली. महिलांच्या सुरक्षेसाठी ५०० नवी वाहने घेणार, अत्याचार व सोनसाखळ्यांची चोरी रोखण्यासाठी २०० दुचाकीस्वार महिलांचे कमांडो पथक तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चंद्रपूर, नांदेड, भंडारा येथे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये लवकरच न्यायाधीशांची नेमणूक करण्यात येणार आहे. कायदेशीर कारवाईसाठी महिला जो वकील मागतील तो दिला जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.