गणेशोत्सवात तूर्तास डीजेला बंदी- उच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 11:58 PM2018-09-14T23:58:21+5:302018-09-15T07:03:34+5:30
साऊंड सिस्टिम वापरण्यासाठी तात्पुरती परवानगी देण्यास नकार
मुंबई : गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि दणदणाट करणाऱ्या साऊंड सिस्टिम वापरणाºयास न्यायालयाने तूर्तास बंदी घातली आहे. सण नेहमी येत-जात असतात. सणोत्सवांच्या काळात होणाºया गोंगाटाकडे आम्ही डोळे बंद करून पाठ फिरवू शकत नाही. तुम्ही लेखी हमी दिली, तरी प्रत्यक्षात मिरवणुकीत किती गोंगाट असतो, याची कल्पना आम्हाला आहे, अशा शब्दात न्यायालयाने कानउघाडणी केली.
सणांच्या काळात व गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी राज्य सरकारने डीजे व साऊंड सिस्टिमचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. सरकारच्या या परिपत्रकाला प्रोफेशनल आॅडिओ आणि लायटनिंग असोसिएशनने (पाला) उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. शंतनू केमकर व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे होती. गेल्या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारला या बंदीबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केले नाही. पालातर्फे अॅड. सतीश तळेकर यांनी गणपती विसर्जन मिरवणुकीत साऊंड सिस्टिम वापरण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली. त्यास न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला. सर्व मुद्यांवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी सरकारला १९ सप्टेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असून त्यादिवशी पुढील सुनावणी होणार आहे.
सरसकट बंदी घालावी का? सरकारला सवाल
साऊंड सिस्टिम वापरण्यास सरसकट बंदी घालणे कितपत योग्य आहे, असा प्रश्नही न्यायालयाने सरकारपुढे उपस्थित केला. एका ठराविक मर्यादेइतकाच आवाज असणाºया साऊंड सिस्टिमवरील बंदी शिथिल करण्यासंदर्भात सरकारची भूमिका काय आहे, असा सवालही न्यायालयाने केला.