आरोपी कोठडीतील जेवणास कंटाळले
By admin | Published: July 5, 2017 05:09 AM2017-07-05T05:09:28+5:302017-07-05T05:09:28+5:30
मंजुळा शेट्ट्ये हत्या प्रकरणात अटक केलेल्या जेलरसह सहाही संशयित आरोपींनी घरचे जेवण मिळावे, यासाठी किल्ला कोर्टात केलेला अर्ज फे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मंजुळा शेट्ट्ये हत्या प्रकरणात अटक केलेल्या जेलरसह सहाही संशयित आरोपींनी घरचे जेवण मिळावे, यासाठी किल्ला कोर्टात केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. आरोपींनी मुलांना भेटण्यासाठी केलेली विनंती मान्य करण्यात आली आहे.
अवघी दोन अंडी आणि तीन पावांच्या हिशेबावरून महिला कैदी मंजुळाला अमानुष मारहाण झाली होती, त्यात उपचाराअभावी तिचा मृत्यू झाला. तिच्या हत्येप्रकरणी जेलर पोलीस उपनिरीक्षक मनीषा पोखरकर, अंमलदार बिंदू नाईकडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे, आरती शिंगणे यांना अटक करण्यात आली आहे. त्या गुन्हे शाखेच्या कोठडीत आहेत. आरोपी तीन दिवसांतच कोठडीतील जेवणाला कंटाळल्या आहेत.
शेट्ये हत्या प्रकरणात आरोपींचे जबाब नोंदविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहेत. त्या पाठोपाठ तपास अधिकारी प्रभा राऊळ यांनी दंगलीच्या गुन्ह्यांचाही तपास सुरू केला आहे. पाच अधिकाऱ्यांच्या पथकाने भायखळा कारागृहातील दंगलीच्या तपासाला मंगळवारपासून सुरुवात केली आहे. महिला कैद्यांचा जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. तपासाअंती लवकरच या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.
मंजुळाच्या डोक्यावर १४ ते १८ जखमा
मंजुळाचा शवविच्छेदनाच्या अंतिम अहवालात तिच्या डोक्यावर १४ ते १८ जखमांसह शरीरावर अंतर्गत व बाह्य भागांवर जखमा आढळूनन आल्या असून त्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. यात गुप्तांगातील जखमांबाबत काहीही माहिती मिळाली नसल्याचे समजते.
प्रवीण दीक्षित करणार चौकशी
राज्य महिला आयोगाने मंजुळा शेट्येच्या हत्येची दखल घेत याचिका दाखल केली आहे. याच्या अधिक तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त करण्यात आले आहे. एसआयटीत राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्यासह निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे आणि स्वयंसेवी संस्थेच्या अंजली देशपांडे यांची नियुक्ती केली आहे. मंजुळाच्या हत्याप्रकरणासह राज्यातील कारागृहातील महिला कैद्यांना पुरविण्यात येणारा आहार, आरोग्य, सुरक्षितता आदींची चौकशी समिती करणार आहे.
अर्ज फेटाळला
मंजुळा शेट्ट्ये हत्याप्रकरणात साक्ष देण्यासाठी इंदिरा करकेरा महिला कैद्याने अर्ज केला होता. मात्र, त्या अर्जावर कुणाचीही स्वाक्षरी नसल्याने, न्यायालयाने तो अर्जही फेटाळून लावला आहे.