कोकणसाठी पर्यटन विकास महामंडळ

By admin | Published: April 12, 2016 03:12 AM2016-04-12T03:12:10+5:302016-04-12T03:12:10+5:30

कोकणसाठी स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळ स्थापन करण्यात येईल, तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या पर्यटन विकासासाठी ३ हजार ५५ कोटी रुपये खर्च करण्यात

Tourism Development Corporation for Konkan | कोकणसाठी पर्यटन विकास महामंडळ

कोकणसाठी पर्यटन विकास महामंडळ

Next

मुंबई : कोकणसाठी स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळ स्थापन करण्यात येईल, तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या पर्यटन विकासासाठी ३ हजार ५५ कोटी रुपये खर्च करण्यात येतील. कोकणसाठी स्वतंत्र विकास मंडळ स्थापन करण्याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.
मुंबई आणि कोकणाविषयीच्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘कोकणासाठीच्या स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळाने अधिक प्रभाावीपणे काम करावे, यासाठी मॅरेटाइम बोर्ड आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सहकार्य घेतले जाईल. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेचे सहकार्य घेण्यात येणार आहे. त्यासाठी ३ हजार ५५ कोटी रुपयांचा आरखडा या बँकेकडे लवकरच सादर केला जाईल.’
केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन केंद्र योजनेंतर्गत कोकणातील विजयदुर्ग, देवगड, शिराळा, सागरेश्वर, मोचेमाळसह नऊ केंद्रांचा विकास करण्यात येणार असून, त्यासाठी ८२.१७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मेक इन इंडियांतर्गत पर्यटन विकासाचे आठ सामंजस्य करार झाले असून, त्यातील सात प्रकल्प कोकणात येत आहेत. पर्यटन महामंडळांतर्गत एक संचालनालय राज्यात निर्माण केले जाणार आहे. त्या अंतर्गत पर्यटकांना सुविधांची हमी दिली जाईल.
रत्नागिरी येथील विमानतळाचा विस्तार केला जाईल आणि ते व्यावसायिक तत्त्वावर चालविले जाईल. कोकणामध्ये आंब्यासह विविध फळांवर प्रक्रिया उद्योग उभारल्यास विशेष सवलती देण्यात येतील. जैन इरिगेशनच्या सहकार्याने आंबा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची घोषणा आधीच झाली आहे. या प्रकल्पासाठी कोकण कृषी विद्यापीठाचे सहकार्य घेतले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणांतर्गत पनवेल-इंदापूर हे ८४ किलोमीटरचे काम सुरू झाले आहे. कर्नाळा अभयारण्यात येणाऱ्या २० किलोमीटरच्या पट्ट्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने हिरवा झेंडा दाखविला असून, या कामाची निविदाही लवकरच काढली जाईल. इंदापूर-झाराप या ३६६ किलोमीटरपैकी १३४ किलोमीटरचे भूसंपादन पूर्ण झाले असून, त्यासाठीच्या निविदा लवकरच काढण्यात येतील आणि हे काम येत्या दोन वर्षांत पूर्ण केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)

सी वर्ल्ड प्रकल्प आता
३५० एकरमध्ये होणार
सी वर्ल्ड हा कोकणातील पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरेल, असा प्रकल्प आता ३५० एकरात उभारण्यात येणार आहे. आधी १ हजार ३९० एकरात तो उभारला जाणार होता, पण त्यात भूसंपादनाच्या अनेक अडचणी होत्या. आता ३५० एकराच्या भूसंपादनासाठी निधी वितरित करण्यात आला आहे. निवाड्याच्या प्रस्तावाला १५ दिवसांत मंजुरी दिली जाईल. ८ ते १२ महिन्यांत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्पासाठी निविदा काढली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

एलिफंटा येथे पर्यटक
निवासस्थान उभारणार
अरबी समुद्रात असलेल्या एलिफंटा लेण्यांच्या ठिकाणी पर्यटकांना मुक्कामी राहता यावे, यासाठी पर्यटक निवास उभारले जाईल.
तेथे मिनी ट्रेन, केबल कारची सुविधा दिली जाईल. विविध वस्तूंची एकाच ठिकाणी विक्री करण्यासाठी रोजगार कुटीर उभारले जाईल. भाऊचा धक्का ते मांडवा अशी जलवाहतूक सुरू केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

Web Title: Tourism Development Corporation for Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.