कोल्हापूर बनणार पर्यटन जिल्हा

By admin | Published: October 21, 2016 02:42 AM2016-10-21T02:42:46+5:302016-10-21T02:42:46+5:30

कोल्हापूर जिल्हा एक आदर्श पर्यटन केंद्र आणि दक्षिण महाराष्ट्राचा परिसर एक आदर्श कॉरिडॉर बनू शकतो; पण त्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी चालू केलेले प्रयत्न अर्धवट सोडता कामा नयेत.

Tourism District becoming Kolhapur | कोल्हापूर बनणार पर्यटन जिल्हा

कोल्हापूर बनणार पर्यटन जिल्हा

Next

- वसंत भोसले

कोल्हापूर जिल्हा एक आदर्श पर्यटन केंद्र आणि दक्षिण महाराष्ट्राचा परिसर एक आदर्श कॉरिडॉर बनू शकतो; पण त्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी चालू केलेले प्रयत्न अर्धवट सोडता कामा नयेत.

कोल्हापूर ही कलानगरी, क्रीडानगरी, शाहूनगरी, चित्रनगरी अशा अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण नगरी आहे. त्यात आता ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून जाहीर करण्याच्या मागणीने ती ‘पर्यटननगरी’ही होणार का?
महाराष्ट्राला पर्यटनाचे अनेक पैलू आहेत; पण त्यांतील एकाचेही धड मार्केटिंग करण्यात आलेले नाही. त्यास कोल्हापूरचादेखील अपवाद नाही. खरे तर ‘महाराष्ट्राचे दक्षिणद्वार’ म्हणून कोल्हापूरचे एक वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थान आहे. या शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. धार्मिक, नैसर्गिक, सांस्कृतिक आणि खाद्य परंपरांचा येथे मिलाफ आहे. संपूर्ण महाराष्ट्राला गोवा, कोकण आणि कर्नाटकात जाताना सहजच कोल्हापूरच्या भवानी मंडपातून जाता येते. अंबाबाई देवस्थानची भक्ती-शक्ती प्रबळ आहे. नुकत्याच संपलेल्या नवरात्रीच्या सणात अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी नऊ दिवसांत २३ लाख भाविकांनी भेट दिली आहे.
उन्हाळी आणि हिवाळी सुट्यांतही कोल्हापूरला भेट देण्यासाठी पर्यटकांची अशाच प्रकारची गर्दी होते. मराठवाड्यापासून खान्देश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांसाठी रस्त्यांवर दिशादर्शक फलकांचाही पत्ता नाही, ही बाब मात्र ‘पर्यटन जिल्हा’ करण्याची तयारी करणाऱ्यांना सांगावी लागेल.
अंबाबाईशिवाय जोतिबा आणि नृसिंहवाडीच्या कृष्णा-पंचगंगा संगमावरील श्री दत्तात्रेयांचे दर्शन घेण्यासाठीही असंख्य भाविक येतात. दर्शनानंतर ते पर्यटन करतात. कोल्हापुरी गुळ, चप्पल आदी खरेदी करीत कोल्हापुरी खाद्यपदार्थांवर यथेच्छ ताव मारतात. शिवाय राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या ऐतिहासिक कामगिरीचे जतन करणाऱ्या न्यू पॅलेसमधील ‘शाहू म्युझियम’लाही भेट देतात.
जोतिबाचे दर्शन घेतल्यानंतर शेजारील पन्हाळगडावर फेरफटका मारतात. बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याची गाथा सांगणारी पावनखिंड पन्हाळगडाच्या पश्चिमेस आहे. शिवाय आंबा, दाजीपूर, आंबोली ही येथील निसर्गरम्य ठिकाणे आहेत. चांदोली आणि दाजीपूरचे अभयारण्य निसर्गवेड्यांना भुरळ घालणारे आहे. शतकमहोत्सवी राधानगरी धरण आहे. त्याचबरोबर अनेक नव्या धरणांचा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशजांचे मूळ ठिकाण म्हणून ज्या गडाचा गौरव केला जातो, तो पारगड चंदगड तालुक्याच्या पश्चिम टोकाला आहे. तेथून गोव्याचे सौंदर्यही न्याहाळता येते. तिलारी धरणाच्या पाण्याभोवतीचा परिसर सुंदरच आहे. येथून कोकण, गोवा आणि कर्नाटकातील दांडेली, कारवार काही तासांच्या अंतरावर आहे.
पुणे शहरातून बाहेर पडलेल्या पर्यटकाला महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा, कोयनेचे अभयारण्य, साताऱ्याचे कास पठार पाहत कऱ्हाडच्या कृष्णा-कोयना संगमावरून अंबाबाईच्या दर्शनास येता येते. त्यासाठी संपूर्ण दक्षिण महाराष्ट्राचा कॉरिडॉर तयार करायला हवा. शिवाय पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. कोल्हापूरला पर्यटनाचे मुख्य केंद्र बनविण्याचा प्रयत्न अनेक वर्र्षांपासून चालू आहे; पण तो अनेक वेळा अर्धवट सोडण्यात येतो.
जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी पर्यटन विकासासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील सुमारे पन्नास टूर आॅपरेटर्सचा तीन दिवसांचा दौरा त्यांनी आयोजित केला होता. त्यांनी एक दिवस कोल्हापूर शहर पाहिले, एक दिवस कोल्हापूर जिल्हा पाहिला आणि तिसऱ्या दिवशी चर्चा, परिसंवाद व बैठका, आदींमध्ये कोल्हापूर जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून कशा पद्धतीने विकसित करता येऊ शकतो, याची चर्चा केली. पर्यटनाशी संबंधित सर्व घटकांना यात सहभागी करून घेतले. यावेळी टूर आॅपरेटर्स संघटनेचे अध्यक्ष आणि ‘वीणा वर्ल्ड’चे संस्थापक सुधीर पाटील यांनी एक आराखडा सादर केला. त्यावर कृती झाली पाहिजे.
कोल्हापूर जिल्हा एक आदर्श पर्यटन केंद्र आणि दक्षिण महाराष्ट्राचा परिसर एक आदर्श कॉरिडॉर बनू शकतो; पण चंद्रकांतदादांनी यासाठी चालू केलेले प्रयत्न अर्धवट सोडता कामा नयेत.

Web Title: Tourism District becoming Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.