अभ्यासाच्या नावाखाली पर्यटन
By admin | Published: September 23, 2015 01:18 AM2015-09-23T01:18:05+5:302015-09-23T01:18:05+5:30
रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांकडे साफ दुर्लक्ष करून संचालक मंडळाने मनमानी कर्जवाटप व तारण मालमत्तेची विक्री केल्यामुळे बँकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेच;
नामदेव मोरे, नवी मुंबई
रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांकडे साफ दुर्लक्ष करून संचालक मंडळाने मनमानी कर्जवाटप व तारण मालमत्तेची विक्री केल्यामुळे बँकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेच; शिवाय रिझर्व्ह बँकेने ठोठावलेल्या दंडाचा भुर्दंडही सोसावा लागला. अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली संचालकांनी केलेले केरळ व काश्मीरचे पर्यटन बँकेला ७ लाख ३० हजार रुपयांना पडले.
राज्यातील सहकारी संस्थांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी १९११ मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची स्थापना करण्यात आली आहे. सहकार चळवळ रुजविण्यामध्ये या बँकेने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे; परंतु मागील काही वर्षांत संचालक मंडळाच्या कारभारामुळे या शिखर बँकेची प्रतिमा मलिन झाली आहे. संचालक मंडळाच्या दुर्लक्षामुळे बँकेला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. सहकारी संस्थांमधील पदाधिकारी विविध ठिकाणी अभ्यासदौरे करीत असतात. संबंधित संस्थेला फायदा व्हावा, असा अंतस्थ हेतू या दौऱ्यांमागे असतो. परंतु राज्य शिखर बँकेच्या संचालकांनी अभ्यासाच्या नावाखाली चक्क केरळ व काश्मीरची पर्यटन ‘एन्जॉय’ केले. त्यासाठी बँकेतून घेतलेली ७ लाख ३० हजार रुपयांची आग्रीम रक्कमही भरलेली नाही. या आरोपांसंदर्भात २८ सप्टेंबरपासून सुनावणी सुरू होणार आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने रेग्युलेशन अॅक्ट १९४९ चे कलम ३५ (ए) अन्वये राज्य शिखर बँकेची तपासणी केली होती. त्यानंतर बँकेच्या कामकाजामध्ये आढळलेल्या गंभीर बाबींसंदर्भात पूर्तता करण्याबाबत निर्देश दिले होते. परंतु बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने त्या निर्देशांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने ५ लाख रुपये दंड ठोठावला.
नाबार्डचे नियम डावलून संचालक मंडळाने ‘आदित्य नेचरफे्रश प्रॉडक्ट’ या खासगी कंपनीस सवलतीच्या दराने कर्ज दिले. यामुळे बँकेचे ३ लाख २७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी चौकशी अधिकारी शिवाजी पहिणकर यांनी ७७ संचालकांवर १० आरोप ठेवले आहेत. या आरोपांसंदर्भात २८ सप्टेंबरपासून सुनावणी सुरू होणार आहे.