कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांची गर्दी

By admin | Published: July 10, 2017 03:10 AM2017-07-10T03:10:22+5:302017-07-10T03:10:22+5:30

वर्षासहलीसाठी मुंबई, नवी मुंबई, पनवेल परिसरातील नागरिकांकडून कर्नाळा अभय अरण्यास प्रथम पसंती दिली जात आहे.

Tourist crowd in Karnala Wildlife Sanctuary | कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांची गर्दी

कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांची गर्दी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : वर्षासहलीसाठी मुंबई, नवी मुंबई, पनवेल परिसरातील नागरिकांकडून कर्नाळा अभय अरण्यास प्रथम पसंती दिली जात आहे. दोन दिवसांमध्ये तब्बल ३५३० पर्यटकांनी अभयारण्यास भेट दिल्याची नोंद झाली आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी पांडवकडा धबधबा बंद केला आहे. खारघरच्या टेकड्यांवर जाण्यासही परवानगी दिली जात नाही. देहरंग धरणासह इतर ठिकाणी असलेल्या धबधब्यांवर जाण्यासही मनाई केली जात आहे. वर्षासहलीसाठी असलेल्या बहुतांश ठिकाणी प्राथमिक सुविधाही मिळत नसल्याने पर्यटकांकडून कर्नाळा अभयारण्य परिसराला भेट देण्यास प्रथम पसंती दिली जात आहे. या परिसरामध्ये छोटे धबधबे, विविध प्रकारचे पक्षी, कर्नाळा किल्ला पाहण्यास मिळत असल्याने शनिवार व रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. २ जुलैला रविवारी १७८२ पर्यटकांनी या परिसराला भेट दिली होती. ८ जुलैला शनिवारी १२५० व रविवारी सायंकाळपर्यंत २२८० पर्यटकांनी भेट दिली होती. मुंबई- गोवा महामार्गाच्या रुंदीकरणामुळे वाहनतळाची जागा कमी झाली असून पर्यटकांना रोडवर वाहने लावावी लागली होती. पर्यटकांना योग्य माहिती मिळावी, उत्साहामध्ये तलावामध्ये उतरू नये, यासाठी वनविभाग व्यवस्थापनाने विशेष उपाययोजना केल्या होत्या; परंतु यानंतरही सुरक्षेच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून अनेक जण तलावामध्ये उतरण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे पर्यटकांना नियंत्रणामध्ये आणण्यासाठी कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती.
अभयारण्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वन विभाग प्रयत्नशील आहे; परंतु पर्यटकांनीही सुरक्षेसाठी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
>अभयारण्यात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पर्यटकांच्या सुविधेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. पर्यटकांनीही दिलेल्या सूचनांचे पालन करून योग्य सहकार्य करावे व सुरक्षितपणे पर्यटनाचा आनंद घ्यावा.
- अन्वर शेख, वन परिमंडळ अधिकारी
>रविवारी तब्बल २२८० पर्यटकांनी अभयारण्यास भेट दिली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून ही विक्रमी संख्या आहे. वनविभागाचे कर्मचारी व संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे.
- पी. पी. चव्हाण, परिक्षेत्र वन अधिकारी

Web Title: Tourist crowd in Karnala Wildlife Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.