त्सुनामी आयलँडवर पर्यटकांची मांदियाळी
By admin | Published: May 18, 2015 03:44 AM2015-05-18T03:44:05+5:302015-05-18T03:44:05+5:30
रूपेरी वाळू आणि निळ्याशार समुद्राचा संगम पाहावयाचा असेल तर कोकणातल्या देवबागजवळील ‘त्सुनामी आयलँड’ला जायलाच हवे.
संदीप बोडवे, मालवण
रूपेरी वाळू आणि निळ्याशार समुद्राचा संगम पाहावयाचा असेल तर कोकणातल्या देवबागजवळील ‘त्सुनामी आयलँड’ला जायलाच हवे. या बेटावरील वॉटर स्पोर्ट्सचा थरार पर्यटकांसाठी ‘थ्रिलिंग एक्सपिरीअन्स’ देणाराच आहे. येथील समुद्राचा तळ, खाडीतील थरार एका वेगळ्याच जगाची अनुभूती देऊन जाणारा आहे.
ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला, स्नॉर्कलिंग, स्कुबा डायव्हींग आणि तारकर्ली बीच ही मालवणच्या पर्यटनाची आजवरची ओळख आहे. पण या यादीत आता त्सुनामी आयलँडने अल्पावधीत स्थान मिळविले आहे. देवबागपासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेले हे बेट देशी-विदेशी पर्यटकांसाठी हॉटस्पॉट ठरले आहे. आॅक्टोबर ते मे या कालावधीत त्सुनामी आयलँडवर विविध प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स पर्यटकांसाठी उपलब्ध असतात. वॉटर स्कूटर, जेट स्की, स्पीड बोट, बनाना राईड, बंपर राईड, पॅडल बोट यांसारखे विविध प्रकार लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत विलक्षण आकर्षणाचे आहेत. आधुनिक पद्धतीचे पॅरासेलिंगही या ठिकाणी उपलब्ध आहे.