जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पोलिसांच्या रडारवर

By Admin | Published: July 18, 2016 03:01 AM2016-07-18T03:01:01+5:302016-07-18T03:01:01+5:30

पावसाळ्यामध्ये पर्यटन स्थळांवर रायगड पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे.

Tourist places in the district on the radar of the police | जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पोलिसांच्या रडारवर

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पोलिसांच्या रडारवर

googlenewsNext

आविष्कार देसाई,
अलिबाग- पावसाळ्यामध्ये पर्यटन स्थळांवर रायगड पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. काही ठिकाणी जाण्यास मज्जावही केला आहे. त्यामुळे वर्षा सहलींसाठी येणाऱ्या पर्यटकांचा चांगलाच हिरमोड होत आहे. पर्यटकांच्या जीवाच्या सुरक्षिततेसाठीच हा निर्णय घेतला असल्याचे रायगड पोलिसांनी सांगितले. शनिवार आणि रविवार या दिवशी येथील पर्यटनस्थळे चांगलीच हाऊसफुल्ल झाली होती.
मुंबई-पुण्यातील पर्यटकांना रायगड जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांचे भलतेच आकर्षण राहिले आहे. पावसाळ्यात तर येथील पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल होतात. अलिबाग हे अंतर कमी असल्याने वनडे पिकनिकसाठी पर्यटकांची पसंती असते.
सध्या पावसाचा हंगाम सुरू असल्याने येथील पर्यटन स्थळे चांगलीच बहरली आहेत. अलिबाग येथील तीनवीरा धरणासह अलिबाग तालुक्यातील अलिबाग बीच, नागाव, आक्षी, वरसोली, किहीम, रेवस, मांडवा या समुद्र किनाऱ्यांवर चांगलीच गर्दी पहायला मिळाली. विशेष करून शनिवार आणि रविवार या वीकेंडला तर तुफान गर्दी असते. तशीच आजच्या रविवारीही येथे होती. येथील समुद्र किनारी त्यांनी समुद्रस्नानाचा आनंद घेतला, तर काहींनी धरणातील पाण्यात डुंबून आपली सुटी मनमुराद एन्जॉय केली.
काही पर्यटक हे मद्य प्राशन करतात. त्यामुळे ते नकळत खोल समुद्रामध्ये पोहण्यासाठी जातात, परंतु समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने ते आत ओढले जातात. अशा बऱ्याच पर्यटकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे काही वेळेला अतिउत्साही पर्यटक हुल्लडबाजी करतात. त्यामुळे स्थानिकांबरोबर त्यांचे वाद होतात. तेव्हा पोलिसांची गरज असते.
मुंबई येथील अशोक लेलॅण्ड कंपनीतील एक ग्रुप अलिबाग येथे पर्यटनासाठी आला होता. त्यानंतर ते अलिबागमधील पर्यटन आटोपून मुरु ड तालुक्यातील काशिद येथील समुद्रकिनारी गेले तेव्हा त्यांना तेथील पोलिसांनी किनारी जाण्यास मज्जाव केला.
समुद्रकिनारी वाईट घटना घडल्या आहेत. तसेच पावसाळ्यात समुद्र काही अंशी खवळलेला असतो. सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनी मज्जाव केला असावा, असे पर्यटक वसंत सोनावणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
काशिद येथे पोलीस मज्जाव करीत असल्याने अलिबागमधील समुद्र किनारी आम्ही मजा केली. येथील किनारे सुरक्षित असल्याचे पर्यटक जय थॉमस यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
समुद्रकिनारी पोलिसांनी कोणालाही मज्जाव केलेला नाही. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी पर्यटकांची गर्दी वाढते. त्यामुळे या दोन दिवशी पेट्रोलिंग वाढविले जाते, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. काही धोकादायक ठिकाणी जाण्यापासून रोखले असेल, तर ते पर्यटकांच्या सुरक्षेसाठी केले असेल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
>वाहतूक कोंडी
एक्स्प्रेस वेवर तेलगळती झाल्यामुळे शनिवारी मध्यरात्रीपासून वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. त्यामुळे लोणावळा, खोपोली परिसरात जाणाऱ्या पर्यटकांना रविवारी दुपारपर्यंत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
>अतिउत्साहामुळे अपघातांची शक्यता
अलिबाग येथील तीनवीरा धरण, पळसदरी, आक्षी, नागाव, किहीम, रेवस मांडवा येथील समुद्रकिनारे त्याचप्रमाणे मुरु ड तालुक्यातील मुरु ड, काशिद समुद्र किनारे, कर्जत तालुक्यातील सोनालपाडा धरण, आषाणे, वदप, मोहिली येथील धबधबे त्याचप्रमाणे माथेरान घाटातील धबधबे, माणगाव तालुक्यातील ताम्हाणी घाटातील धबधबे यासह अन्य महत्त्वाच्या पर्यटनस्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढविला आहे.
पनवेलजवळील आदई धबधबा, कर्नाळा पक्षी अभयारण्य, मुरुडजवळील फणसाड धबधब्यावर सध्या गर्दी होत आहे. श्रीवर्धन, काशिद, मुरुड बीचवरही पर्यटकांची गर्दी होत असल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
>आंबोली धरणावर गर्दी
नांदगाव : मुरु ड तालुक्यातील खारआंबोली ग्रामपंचायत हद्दीमधील आंबोली धरणावर पर्यटक व स्थानिक नागरिकांची शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी प्रचंड गर्दी पाहावयास मिळत आहे. पाटबंधारे विभागामार्फतया धरणाची निर्मिती करण्यात येऊन सदरील धरण बांधण्यासाठी २९ कोटी रु पये खर्च करण्यात आला आहे.
धरणातील ओव्हरफ्लो पाणी एका मोठ्या हौदात जाऊन त्या भागात पर्यटकांना पोहण्याची संधी दिल्याने येथे प्रचंड गर्दी पाहावयास मिळते. लहान मुले व मोठी मंडळी मोठ्या उत्साहात पाण्यात पोहण्याचा आनंद घेत आहेत. पर्यटकांबरोबरच स्थानिक नागरिक सुद्धा मोठी गर्दी करत असून याचा आनंद लुटताना दिसत आहेत.
धरणांमधून दुबार शेती केली जात असून यातील १५ टक्के पाणीपुरवठा शहरी नागरिकांना होत असतो. सदरील धरण बारमाही तुडुंब ओसंडून वाहत असल्याने ग्रामीण व शहरी नागरिकांना कधीही पाण्याचा तुटवडा भासत नाही.
ओव्हरफ्लो पाण्यामधून पर्यटकांना मोठी सुविधा प्राप्त झाल्याने याचा पर्यटन वृद्धीसाठी उपयोग होत आहे. दिवसेंदिवस येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी पाहावयास मिळत आहे.
मुंबई, ठाणे, बोरीवली या भागातील पर्यटक मौजमजा करताना याठिकाणी येत आहेत. धरणे भरल्याने स्थानिकांना दिलासा मिळाला.
>तीनवीरा धरणावर पर्यटकांची गर्दी
कार्लेखिंड : पावसाळा सुरू झाला की पर्यटकांना ओढ लागते ती धबधब्यांची. अलिबाग-मुरु ड तालुक्यांना समुद्रकिनारे आहेतच परंतु निसर्गाने सुध्दा त्यात भर टाकली आहे. ठिकठिकाणी पावसाळ्यात धबधबे तयार होतात. पैकी अलिबाग- वडखळ मार्गावर असलेले तीनवीरा धरण व परिसरातील हिरवाई पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.
धरणाच्या बंधाऱ्यावरून जवळपास पन्नास ते साठ फुटांवरून पडणारे पाणी फेसाळत खाली येत असल्याने भिजण्याची मजा काही औरच असल्याचे पर्यटक सांगतात. वर्षासहलीसाठी सुरक्षित ठिकाण म्हणूनही याला लोकांची पसंती मिळत आहे. रविवार असल्यामुळे पुणे-मुंबईच्या पर्यटकांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती.

Web Title: Tourist places in the district on the radar of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.