रत्नागिरीतील पर्यटनस्थळांना मिळणार ‘वायफाय’ची सुविधा
By admin | Published: May 18, 2015 04:04 AM2015-05-18T04:04:51+5:302015-05-18T04:04:51+5:30
जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे असलेल्या ठिकाणी येत्या सहा महिन्यात भारतीय दुरसंचार निगम लिमिटेडतर्फे वायफाय सेवा उपलब्ध होणार
रत्नागिरी : जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे असलेल्या ठिकाणी येत्या सहा महिन्यात भारतीय दुरसंचार निगम लिमिटेडतर्फे वायफाय सेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती भारतीय दूरसंचार निगम (बीएसएनएल)चे येथील महाप्रबधंक सुहास कांबळे यांनी आज पत्रकारांना दिली.
प्रत्येक वर्षी १७ मे ला ‘विश्व दूरसंचार दिवस’ साजरा केला जातो. या दिवसानिमित्त बीएसएनएलच्या कार्याची माहिती देण्यासाठी कांबळे यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांच्यासमवेत उपमंडल अभियंता पी. आर. पारोलकर हेही उपस्थित होते. भारतातील प्रत्येक खेड्यापर्यंत आॅप्टिकल फायबर केबल नेटवर्क पोहचविण्यासाठी २२.८ कोटी रूपयांचा नोफान (ठऋडठ) प्रकल्प कंपनीने हाती घेतला आहे. पहिल्या टप्प्यात मंडणगड, रत्नागिरी, खेड आणि संगमेश्वर या चार तालुक्यांमधील ३८३ ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबरने जोडण्यात येणार आहेत. मंडणगडमधील ९ ग्रामपंचायतींचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर उर्वरित पाच तालुक्यांतील ग्रामपंचायतींचे काम हाती घेण्यात येईल. यासाठी निविदा प्रकिया पूर्ण झाली असून डिसेंबर अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल, असा विश्वासही कांबळे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
खासगी सेवांच्या तुलनेने अधिक चांगल्या सुविधा देण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचे कांबळे यांनी सांगितले. जिल्ह्यात १७१ टेलिफोन एक्स्जेंच आहेत तर एकूण २०० मोबाईल टॉवर कार्यरत आहेत. पाच वर्षापुर्वी खासगी कंपन्यांना भाडेतत्वावर घेतलेले टॉवर अटी पूर्ण न केल्याने पडून आहेत. असे जिल्ह्यात एकूण ३७ टॉवर्स आहेत. या टॉवर्सच्या माध्यमातून कंपनीला प्राप्त झालेल्या १५ ‘बेस्ट टर्मिनल स्टेशन’ च्या माध्यमातून सेवा देण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र येत असलेला नेटवर्कची समस्याही सुटेल, असे कांबळे यांनी सांगितले. कंपनीच्या ‘रात्री बोला मोफत’ या योजनेला १ मेपासून प्रारंभ झाला असून ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात ४०० दूरध्वनींची भर यामुळे पडली असल्याचे कांबळे यांनी सांगितले. प्रत्येक खेड्यापर्यंत मोबाईल नेटवर्क पोहचवून जनतेला संपर्क सुविधा देण्यासाठी कंपनीने कंबर कसली असल्याचे यावेळी कांबळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)