पेट्रोलविना पर्यटकांची चाके थांबली...

By admin | Published: May 19, 2015 10:12 PM2015-05-19T22:12:19+5:302015-05-20T00:15:07+5:30

विनाकारण खोळंबा : ऐन पर्यटनाच्या हंगामात उभे राहिले नवे संकट, पर्यटकांच्या फिरतीला टंचाईचा ब्रेक

Tourist wheels stop in Petrol without ... | पेट्रोलविना पर्यटकांची चाके थांबली...

पेट्रोलविना पर्यटकांची चाके थांबली...

Next

रत्नागिरी : सुट्टीचा हंगाम असल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक आले आहेत. मात्र तेवढ्यातच पेट्रोल, डिझेलची टंचाई सुरू झाल्याने पर्यटकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. मुंबई, पुण्याहून आलेल्या पर्यटकांना गाडीत इंधन नसल्यामुळे परतणे अशक्य झाले असून स्वत:चे वाहन आणूनही त्यांना अडकून पडावे लागले आहे.सुट्टीसाठी पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात आले आहेत. रविवारपासूनच पंपावरील पेट्रोल संपल्याचे फलक लावण्यात आले होते. शहरातील केवळ एका पेट्रोलपंपावर पेट्रोल उपलब्ध होते. मात्र त्याठिकाणी पेट्रोल मिळवण्यासाठी लांबच लांब रांग लागली होती. त्यातच काही नागरिक कॅन, बाटलीमधूनही पेट्रोल नेत असल्याने व पेट्रोलटंचाईच्या भीतीने अनेक वाहनचालकांनी हजार ते दीड हजार रुपयांचे पेट्रोल भरणे पसंद केले. त्यामुळे आलेले पेट्रोल, डिझेलचे टँकर झटपट खाली होत होते.
सध्या पर्यटन हंगामामुळे रत्नागिरी, गणपतीपुळे, दापोली, गुहागर आदी ठिकाणी हॉटेल्स फुल्ल आहेत. त्याचबरोबर मुंबईकरही खासगी गाड्या घेऊन रत्नागिरीत आले आहेत. पंपावर पेट्रोल नसल्यामुळे त्यांना परतणे अशक्य झाले होते. वाटेतील अन्य पेट्रोलपंपसुध्दा बंद असल्यामुळे तेथे पोहोचणे शक्य नव्हते. काही ठिकाणी जादा पैसे घेऊन पेट्रोल विकण्यात आले. शक्य होते, त्या मंडळींनी अधिक पैसे देऊन पेट्रोल खरेदी केले. अनेक पर्यटक केवळ पेट्रोल नसल्याने अडकून पडले आहेत. या साऱ्या गदारोळात हॉटेल्स, लॉजिंग मात्र फुल्ल झाली आहेत. शनिवार, रविवार सुट्टी घेऊन आलेल्या काही पर्यटकांना सोमवारी परतणे गरजेचे असतानादेखील परतणे शक्य झाले नाही.
मंगळवारी शहरातील काही पेट्रोलपंपावर पेट्रोल आले असले तरी सायंकाळपर्यंत पंपावरील गर्दी ओसरली नव्हती. काही पर्यटकांनी सकाळपासूनच रांग लावून दुपारनंतर रत्नागिरी सोडल्याचे काही हॉटेल्स व्यवसायिकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ऐन सुट्टीच्या हंगामातील पेट्रोल पंप बंदचा फटका पर्यटकांना बसला तरी हॉटेल व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरला.
सध्या असलेली पेट्रोलटंचाईची परिस्थिती पूर्वपदावर येण्यास आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे.त्यामुळे आणखी दोन दिवस पर्यटकांना पेट्रोल खरेदी करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.(प्रतिनिधी)

नाहक मुक्काम वाढला.
पुण्यातून आम्ही शनिवारी आलो होतो. गणपतीपुळे व रत्नागिरी पाहून रविवारी रात्री परतण्याचे नियोजन होते. रत्नागिरीत रात्री भोजन केल्यानंतर पेट्रोल घेण्यासाठी पंपावर गेलो तर पंप बंद होते. सोमवारीही पेट्रोल उपलब्ध झाले नाही. आज दुपारी पेट्रोल मिळाले. त्यामुळे नाहक मुक्काम वाढवावा लागला.
-पी. एन. देशपांडे, पर्यटक (पुणे)

गाडीत इंधन नसल्यामुळे परतणे अशक्य.
रविवारपासूनच पंपावरील पेट्रोल संपल्याचे फलक.
रत्नागिरी शहरातील केवळ एका पेट्रोलपंपावर पेट्रोल उपलब्ध.
पेट्रोलटंचाईची परिस्थिती पूर्वपदावर येण्यास आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता .
पेट्रोल खरेदीसाठी तारेवरची कसरत.

Web Title: Tourist wheels stop in Petrol without ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.