खडवली नदीवर पर्यटकांच्या गर्दीला उधाण
By Admin | Published: April 27, 2016 03:17 AM2016-04-27T03:17:02+5:302016-04-27T03:17:02+5:30
ठाणे, मुंब्रा, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, वासिंद येथून पर्यटकांनी खडवली नदीवरील पिकनिक पॉइंटवर गर्दी केली आहे.
टिटवाळा : महिनाभरापासून उन्हाची काहिली वाढल्याने त्यापासून दोन घटका सुटका व्हावी व मस्त डुंबण्याचा आनंद घेता यावा याकरिता ठाणे, मुंब्रा, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, वासिंद येथून पर्यटकांनी खडवली नदीवरील पिकनिक पॉइंटवर गर्दी केली आहे. त्यातच आता शाळा व महाविद्यालयांच्या सुट्या सुरू झाल्याने पर्यटकांच्या उत्साहाला भरते आले आहे.
आबालवृद्धांचे समूह नदीच्या संथ वाहणाऱ्या पाण्यात पोहण्याचा मनमुराद आनंद घेत असल्याचे चित्र पाहायला मिळते. रविवार व सुटीच्या दिवशी तर नदीचा किनारा चौपाटीसारखा पर्यटकांनी भरून
जातो. पर्यटकांची गर्दी होऊ लागल्याने आजूबाजूच्या धाब्यांवर घरगुती जेवणाकरिता अक्षरश: रांगा लागतात.
ज्यांना नदीत पोहता येत नाही त्यांच्याकरिता हवा भरलेल्या रबरी ट्युब भाड्याने मिळतात. नदीच्या दोन्ही तीरांवर दोन अति महत्त्वाच्या वास्तू आहेत. त्यामधील एक स्वामी समर्थ मठ तर दुसरे मातोश्री वृध्दाश्रम हे आहे. पर्यटक आवर्जून तेथे भेटी देतात.
>या ठिकाणी कसे जायचे ?
या ठिकाणी मुंबईहून आसनगांव किंवा कसारा लोकल पकडून येता येते. टिटवाळानंतरचे स्थानक खडवली येथे उतरून चालत पाच मिनिटांत पिकनिक पॉइंटवर पोहोचता येते. तसेच मुंबई-नाशिक महामार्गाने पडघ्याजवळून फाटा फुटतोय तेथून वाहनाने खडवलीकडे येता येते.