राणीच्या बागेत पर्यटकांची रेकॉर्डब्रेक गर्दी, पार्किंग फुल्ल
By Admin | Published: May 21, 2017 01:51 PM2017-05-21T13:51:34+5:302017-05-21T16:16:40+5:30
भायखळ्यात राणीच्या बागेत आज पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. तिकीट काढायची रांग उद्यानाबाहेरपर्यंत गेली आहे.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - भायखळ्यात राणीच्या बागेत आज पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. तिकीट काढायची रांग उद्यानाबाहेरपर्यंत गेली आहे. मोठ्या संख्येने खासगी वाहनांमधून आलेल्या पर्यटकांमुळे राणीबागेतील पार्किंग दुपारी दीड वाजताच बंद करावी लागली आहे.
प्रवेशाचा मुख्य प्रवेशद्वार वाहनांसाठी बंद केल्याने खासगी वाहनचालकांची पुरती धांदल उडाली आहे. एरव्ही सार्वजनिक सुटी आणि शनिवार व रविवार असल्यास पार्किंग दुपारी ३ वाजता बंद केली जाते. मात्र, आज मोठ्या प्रमाणात उसळलेल्या गर्दीमुळे प्रशासनाने वाहनांसाठी प्रवेशद्वार बंद केले आहे. रविवारचा दिवस साधून पेंग्विन पाहात रविवारची सुटी सत्कारणी लावण्यासाठी हजारो पर्यटक राणीबागेत दाखल झाले आहेत.
एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या पर्यटकांना हाताळण्यासाठी महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांच्या मदतीला अनिरूद्ध अॅकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. तिकिटघराच्या तीन खिडक्या सुरू असतानाही पर्यटकांची रांग हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढतच आहे. दुचाकींसह चारचाकीमधून येणाऱ्या पर्यटकांमुळे प्रवेशद्वाराबाहेर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. परिणामी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना काही प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, राणीबागेचा मुख्य प्रवेशद्वार बंद केल्याने प्रवेशद्वाराबाहेर लोकांनी गर्दी केली आहे. सोमवार ते शुक्रवार दरम्यान सायंकाळी ५ वाजेपर्यंत लोकांसाठी खुले असणारे उद्यान शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुटी दिवशी दुपारी ३ वाजताच बंद केले जाते. या माहितीपासून अनभिज्ञ असलेले पर्यटक प्रवेशद्वाराबाहेर गोंधळ घातला. पर्यटकांची संख्या पाहून प्रशासनाने आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत पर्यटकांना प्रवेश दिला होता. मात्र तरीही पर्यटकांची संख्या कमी होत नसल्याने अखेर मुख्य प्रवेश द्वार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.