बोअर वेलच्या पाण्याने विहिरी भरल्या तुडुंब!
By admin | Published: May 10, 2016 03:50 AM2016-05-10T03:50:01+5:302016-05-10T03:50:01+5:30
जानेवारीतच पाण्याअभावी अनेकांचे बोअरवेल बंद पडले़ शेतातील पिके जळाली़ मात्र पारनेर तालुक्यातील लोणी हवेली गावात बोअर वेलचे पाणी बंद होऊन पाच महिने उलटल्यानंतर
विनोद गोळे , पारनेर (अहमदनगर)
जानेवारीतच पाण्याअभावी अनेकांचे बोअरवेल बंद पडले़ शेतातील पिके जळाली़ मात्र पारनेर तालुक्यातील लोणी हवेली गावात बोअर वेलचे पाणी बंद होऊन पाच महिने उलटल्यानंतर अचानक त्यातून खळाखळा पाणी वाहू लागले़ विशेष म्हणजे बोअरच्या पाण्याने विहिरीही भरल्याचा चमत्कार झाला आहे.
ऐन दुष्काळात खळाळणारे पाणी पाहण्यासाठी लोकांची येथे गर्दी होत आहे़ शहरापासून सात किलोमीटरवर लोणी हवेली गावाने सर्वाधिक बंधारे बांधल्याने तेथे पाणी टंचाई कमी आहे. खडकवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या बोअरचे पाणी जानेवारीतच संपल्याने कांदा पाण्याअभावी वाळून गेला. या भागाला गावातील विहिरीतून पाणी मिळावे ग्रामपंचायत पाईपलाईन टाकण्याचा प्रयत्न करीत होती.
गुरुवारी राजेंद्र सीताराम सोंडकर यांना त्याच्या बोअरमधून पाण्याचा खळखळ आवाज ऐकू आला़ त्यांनी बोअर सुरू केले तर चक्क मोठ्या प्रमाणात पाणी आले. सलग आठ तास बोअर चालल्यानंतर त्यांची विहिरही तुडुंब भरली. ही माहिती समजताच सरपंच सुभाष दुधाडे, उपसरपंच संजय कोल्हे, ग्रामसेवक सुनील दुधाडे आदींनी खडकवाडी गाठली. सोंडकर यांच्या बोअरमधून दीड इंचापर्यंत पाणी वाहत होते़ त्यांच्याच शेजारी सोपान कोल्हे, भास्कर कोल्हे, सागर कोल्हे,जयराम कोल्हे,दिनानाथ कोल्हे,पोपट कोल्हे,राजेंद्र कोल्हे, तुकाराम कोल्हे, माधव कोल्हे यांच्या बोअरलाही पाणी आले आहे़ आम्ही दिवसभर बोअर चालू ठेवले आहेत तरी पाणी बंद झाले नाही, असे सागर कोल्हे यांनी सांगितले.