शेतकरीविरोध डावलून टाऊनशिप
By Admin | Published: June 23, 2017 03:39 AM2017-06-23T03:39:10+5:302017-06-23T03:39:10+5:30
राज्यातील दहा जिल्ह्यांना छेदून जाणाऱ्या बहुचर्चित ७१० किमीच्या मुंबई नागपूर समृद्धी मार्गासाठी लागणाऱ्या जमीन
नारायण जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्यातील दहा जिल्ह्यांना छेदून जाणाऱ्या बहुचर्चित ७१० किमीच्या मुंबई नागपूर समृद्धी मार्गासाठी लागणाऱ्या जमीन संपादनास असणारा शेतकऱ्यांचा विरोध डावलून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हातात हात घेऊन नगरविकास विभागाने या मार्गावरील कृषी समृद्धी केंद्र अर्थात टाऊनशिप उभारण्यासाठीचे अधिकार रस्ते विकास महामंडळाला ५ जून २०१७ रोजीच बहाल केल्याचे उघड झाले आहे.
या निर्णयामुळे यानुसार ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यासह वर्धा, बुलडाणा, जालना, नागपूर, अमरावती, वाशीम, औरंगाबाद आणि अहमदनगर येथे या टाऊनशिप उभारण्याचा मार्ग सुकर झाला असून, तेथील ग्रामपंचायतीचे अधिकार संपुष्टात येऊन ते नवनगर विकास प्राधिकरण म्हणून रस्ते विकास महामंडळाकडे आपसूक आले आहेत.
यात ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील कासगाव, सापगाव,शेलवली, खुटघर, फुगळे, वाशाळा, हिव आणि रास या गावांतील जमिनीवर हे कृषी समृद्धी केंद्र अर्थात नवी टाऊनशिप उभारण्यात येणार आहे. राजधानी मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि भिवंडी या महापालिकांसह नाशिक शहरापासून ही टाऊनशिप जवळ असल्याने येथील जागांना सोन्याचे भाव आले आहेत.
या भागात टाऊनशिप येणार असल्याचे आधीच माहीत असल्याने मंत्रालयातील अनेक सनदी अधिकाऱ्यांनी येथे नातेवाईकांच्या नावे जमिनी विकत घेऊन ठेवल्याचा आरोप करून शहापूर तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरले होते. मात्र, त्यांचा विरोध डावलून आता नगरविकास विभागाने येथील कृषी समृद्धी केंद्राचे नियोजन प्राधिकरण म्हणून रस्ते विकास महामंडळास घोषित केले आहे.
प्रत्येकी ५०० हेक्टरची एक टाऊनशिप
या संपूर्ण मार्गावर एकूण २४ कृषी समृद्धी केंद्रे उभारण्यात येणार आहेत. दोन कृषी समृद्धी केंद्रांतील अंतर साधारणत: २० ते ४० किमी राहणार असून, प्रत्येकाचे क्षेत्र ४०० ते ५०० हेक्टर राहणार आहे.
त्या ठिकाणी गरज आणि संभाव्य क्षमता लक्षात घेऊन कृषी पूरक उद्योग, पर्यटन, शैक्षणिक सुविधा केंद्र, वैद्यकीय सुविधा निर्माण करून रोजगारनिर्मिती करण्यात येणार आहे. याशिवाय फूड मॉल, पेट्रोल पंप, मनोरंजन मॉल, शीतगृह, वखारींची साखळी, आणि सर्वांसाठी घरे बांधण्यात येणार आहेत. यावर टाऊनशिपमधील पायाभूत सुविधांवर रस्ते विकास महामंडळ २४०० कोटी रुपये खर्च करणार आहे.
या जिल्ह्यात कृषी समृद्धी केंद्र
ठाणे जिल्ह्यातील शहापूरप्रमाणेच वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील बीड नाकझरी, बोरी, खानापूर, मानकापूर, नागाझरी, रामपूर, रेनकापूर या गावांत ती उभारण्यात येणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील सावरगाव माळ, निमखेड, गोळेगाव आणि मेहकर तालुक्यातील गावंडळ, काबरा, साबरा, फैजलपूर, भूमरा येथे आणि नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील वडगाव बक्षी, हळदगाव, भानसुली, सावंगी येथे टाऊनशिप होणार आहे.
अमरावतीच्या धामणगाव तालुक्यातील दत्तपूर, जळगाव आर्वी, नारगवंडी, आणि आसेगाव येथे तर वाशीमच्या कारंजा तालुक्यातील शाहा, वाल्हाई, भिलखेडा सह मालेगाव तालुक्यातील रिधोरा, सुकांदा, वारंगी, ब्राम्हणवाडा आणि मंगळूरपीर तालुक्यातील वानोजा, पूर व भूर येथे कृषी समृद्धी केंद्र उभारण्यात येणार आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील हडस, करंजागाव, लासूरगाव, साहनापूर, धापगावसह जांभूळगाव येथे ही टाऊनशिप उभारण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या राहता आणि कोपरगावच्या सावळी विहीर खुर्द, सावळी विहीर बुद्रूक आणि चांदे कासारे येथेही कृषी समृद्धी केंद्र आकारास येणार आहे.