मद्य, मद्यार्काच्या शोधासाठी ‘ट्रॅक अॅण्ड ट्रेस’ प्रकल्प
By admin | Published: January 25, 2017 03:48 AM2017-01-25T03:48:14+5:302017-01-25T03:48:14+5:30
देशी-विदेशी मद्य व मद्यार्काच्या राज्यात अवैधपणे होत असलेल्या तस्करीला आळा घालण्यासाठी आता त्या वाहनांचा शोध घेण्यासाठी जीपीएस ‘ट्रॅक अॅण्ड ट्रेस’ प्रकल्प राबविला जाणार आहे.
जमीर काझी / मुंबई
देशी-विदेशी मद्य व मद्यार्काच्या राज्यात अवैधपणे होत असलेल्या तस्करीला आळा घालण्यासाठी आता त्या वाहनांचा शोध घेण्यासाठी जीपीएस ‘ट्रॅक अॅण्ड ट्रेस’ प्रकल्प राबविला जाणार आहे. त्याद्वारे दारूची वाहतूक करणाऱ्या संबंधित वाहनांची इत्थंभूत माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या कंट्रोलरूममध्ये आपसूक पोहोचणार आहे.
‘ट्रॅक अॅण्ड ट्रेस’ हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी राज्य सरकारने उत्पादन शुल्क आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञाची समिती निवडली आहे. हे सॉफ्टवेअर कार्यान्वित झाल्यास रोज जकात चुकवून होत असलेल्या लाखो रुपये किमतीच्या मद्याबाबत माहिती मिळणार आहे. त्यामुळे विभागाच्या महसुलात मोठी वाढ होणार असल्याचे उत्पादन शुल्क विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
राज्य उत्पादन शुल्क विभाग हा राज्याच्या महसुलावर परिणाम करणारा मोठा विभाग आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून अवैद्य मद्य व मद्यार्काची वाहतूक व विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचा मोठा फटका महसुलावर होत असल्याचे विभागाने केलेल्या चौकशीतून स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला प्रतिबंध घालण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जाऊनही फारसा फरक पडत नसल्याने आयुक्त व्ही. राधा यांनी अशा वाहनांचा ‘ट्रॅक अॅण्ड ट्रेस’ लावणारे सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून त्याद्वारे मद्य व मद्यार्काची अवैध वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांची माहिती तत्काळ उत्पादन शुल्काच्या संबंधित अधीक्षक कार्यालयाच्या कंट्रोलरूमला मिळेल. त्यानंतर भरारी पथकाकडून त्या ठिकाणी जाऊन कार्यवाही केली जाईल. हे सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमण्याचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पाच तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली आहे.