१६ वर्षीय मुलाच्या हाती दिला ट्रॅक्टर;थेट कोसळला ८० फूट खोल विहिरीत, मजूर महिलांचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 07:18 IST2025-04-05T07:18:12+5:302025-04-05T07:18:24+5:30

Nanded News: पोटासाठी मिळेल ते काम करून जगणाऱ्या सात कष्टकरी महिलांचा ट्रॉलीसह ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने बुडून दुर्दैवी अंत झाला. नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारात शुक्रवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना घडली.

Tractor given to 16-year-old boy; falls directly into 80-feet deep well, women laborers drown to death | १६ वर्षीय मुलाच्या हाती दिला ट्रॅक्टर;थेट कोसळला ८० फूट खोल विहिरीत, मजूर महिलांचा बुडून मृत्यू

१६ वर्षीय मुलाच्या हाती दिला ट्रॅक्टर;थेट कोसळला ८० फूट खोल विहिरीत, मजूर महिलांचा बुडून मृत्यू

 नांदेड  - पोटासाठी मिळेल ते काम करून जगणाऱ्या सात कष्टकरी महिलांचा ट्रॉलीसह ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने बुडून दुर्दैवी अंत झाला. नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारात शुक्रवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना घडली. मृतांमध्ये पाच महिला आणि दोन तरुणींचा समावेश आहे. तर विहिरीत पडलेल्या दोन महिला आणि एका पुरुषाला सुखरूप बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. जवळपास सहा तासांच्या प्रयत्नानंतर ट्रॅक्टर अन् मृतदेह बाहेर काढण्यात आले. विशेष म्हणजे, १६ वर्षांचा अल्पवयीन मुलगा हा ट्रॅक्टर चालवित होता. ही दुर्घटना घडताच तो फरार झाला आहे.

आलेगाव येथील शेतकरी दगडोजी लक्ष्मण शिंदे यांच्या शेतात गुंज येथील महिला, पुरुष कामाला येतात. शुक्रवारी पहाटे शिंदे यांच्याकडील अल्पवयीन चालक मुलाने गुंज गावातून महिलांना ट्रॅक्टरमध्ये घेतले. ट्रॅक्टर साडेसात वाजेच्या सुमारास तेथे पोहोचला. त्यावेळी विहिरीलगत असलेल्या चारीतून ट्रॅक्टर वर काढून दुसऱ्या शेतात नेताना हा अपघात झाला. ट्रॅक्टर कंट्रोल होत नाही हे लक्षात येताच अल्पवयीन चालकाने उडी घेत स्वत:चा जीव वाचवला. पण, दहा जणांसह ट्रॅक्टरच्या हेडसह ट्रॉली विहिरीत कोसळली. 

त्यावेळी घटनास्थळी धाव घेतलेल्या शेतकरी, ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचे प्राण वाचविता आले. पण, पाण्यात बुडालेल्या सात महिलांचा जीव त्यांना वाचविता आला नाही.

अल्पवयीनाच्या हाती स्टेअरिंग कशासाठी?
अल्पवयीन चालक हा अनेक वर्षांपासून दगडोजी शिंदे यांच्या शेतात काम करतो. तो अवघा १६ वर्षांचा असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अल्पवयीन मुलाच्या हाती ट्रॅक्टरचे स्टेअरिंग दिलेच कशाला? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. 

मृतांच्या कुटुंबीयांना सात लाखांची मदत जाहीर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. पंतप्रधान कार्यालयानेही दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.  

८० फूट खोल विहिरीत ४० फूट पाणी होते. सर्व जण ट्रॉलीच्या खाली अडकले. त्यावेळी दोन महिला अन् एका पुरुषाच्या हाती विहिरीतील मोटारीचा पाइप लागला. त्याचा आधार घेत ते मदतीसाठी धावा करीत होते. 

‘त्या’ महिलांचे ऐकले असते तर वेळ टळली असती...
पाऊस झालेला असल्याने चारीतून ट्रॅक्टर निघणार नाही, चढ-उतार आहे. तिकडे ट्रॅक्टर नको घालू, आम्हाला इकडेच उतरू दे, असे सांगूनही अल्पवयीन चालकाने केलेले डेअरिंग ७ महिलांच्या जीवावर बेतले. 
त्या महिलांची विनवणी अल्पवयीन चालकाने ऐकली असती तर ही वेळ आलीच नसती, त्याची निष्काळजी अन् हुल्लडबाजीनेच हा अपघात झाल्याचे सांगत नातेवाइकांनी त्याच्याविषयी रोष व्यक्त केला. 
यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. या अल्पवयीन चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.  

मृतांमध्ये दोन मुलींचा समावेश 
मृतांमध्ये ताराबाई सटवाजी जाधव (३५), सरस्वती लखन बुरूड (२५), चऊत्राबाई माधव पारधे (४५), सपना उर्फ मीना राजू राऊत (२५), ज्योती इरबाजी सरोदे (३०) या पाच महिला आणि धुरपता सटवाजी जाधव (१८), सीमरन संतोष कांबळे (१८) या दोन मुलींचा समावेश आहे. जखमींमध्ये पार्वतीबाई रामा बुरूड (३५), पुरभाबाई संतोष कांबळे (४०), सटवाजी जाधव (५५) या तिघांचा समावेश आहे. 

 

Web Title: Tractor given to 16-year-old boy; falls directly into 80-feet deep well, women laborers drown to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.