अन्य राज्यांमध्ये व्यापार खुला, महाराष्ट्रात जादा बंधनांमुळे नाराजी; व्यावसायिकांमध्ये कमालीची अस्वस्थता 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 02:20 PM2021-07-04T14:20:45+5:302021-07-04T14:21:21+5:30

कोरोनाच्या निर्बंधांबाबत राज्यातील व्यापाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. आमचे नुकसान होत आहे म्हणून आम्ही बोलत नाही. व्यापारावर पोटपाणी असलेल्या लाखो कष्टकऱ्यांचा विचार शासनाने करायला हवा, अशी भावना प्रमुख व्यापारी संघटनांनी केली आहे.

Trade open in other states, displeased with extra restrictions in Maharashtra; Extreme discomfort among professionals | अन्य राज्यांमध्ये व्यापार खुला, महाराष्ट्रात जादा बंधनांमुळे नाराजी; व्यावसायिकांमध्ये कमालीची अस्वस्थता 

अन्य राज्यांमध्ये व्यापार खुला, महाराष्ट्रात जादा बंधनांमुळे नाराजी; व्यावसायिकांमध्ये कमालीची अस्वस्थता 

googlenewsNext


यदु जोशी -

मुंबई : देशातील महत्त्वाच्या काही राज्यांमध्ये कोरोनासंदर्भातील निर्बंध शिथिल करण्यात आले असताना महाराष्ट्रातच कडक का, असा सवाल करीत आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे यासंदर्भातील तुलनात्मक माहिती सादर करण्यात आली आहे. तसेच दर दोन आठवड्यांनी आढावा घेण्याऐवजी कोरोना परिस्थितीचा दर आठवड्याला आढावा घेऊन निर्बंध शिथिल करा, अशी मागणीही होत आहे. (Trade open in other states, displeased with extra restrictions in Maharashtra; Extreme discomfort among professionals)

कोरोनाच्या निर्बंधांबाबत राज्यातील व्यापाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. आमचे नुकसान होत आहे म्हणून आम्ही बोलत नाही. व्यापारावर पोटपाणी असलेल्या लाखो कष्टकऱ्यांचा विचार शासनाने करायला हवा, अशी भावना प्रमुख व्यापारी संघटनांनी केली आहे. फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शहा यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. अत्यावश्यक व्यतिरिक्त असलेल्या दुकानांमध्ये एरवीदेखील प्रचंड गर्दी कधीही उसळत नाही. शिवाय तेथे जी काही गर्दी होईल तिचे नियोजन करून ती सुरू  करण्यास अनुमती दिली पाहिजे, अशी भूमिका असोसिएशनने या पत्रात घेतली आहे. सर्व प्रकारची दुकाने निदान रात्री ८ पर्यंत सुरू ठेवा, असे साकडे त्यांनी घातले आहे. 

उत्तर प्रदेशात शिथिलता
उत्तर प्रदेशात कंटेनमेंट झोनव्यतिरिक्त अन्यत्र निर्बंध शिथिल केले आहेत. मॉल्स आणि रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार रात्री ९ पर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची अनुमती दिली आहे. कंटेनमेंट झोनबाहेरील दुकाने आणि बाजार हे सोमवार ते शुक्रवार सुरू ठेवण्याचीही अनुमती आहे. 

दिल्लीत मॉल्सना मुभा
दिल्लीमध्ये सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत बाजार, मॉल्स, बाजार संकुले आणि दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तमिळनाडूमध्ये शॉपिंग मॉल्स, विविध देवस्थाने यांच्यासह व्यायामशा‌ळांना सुरू ठेवण्याची अनुमती आहे. 

पंजाब, केरळची स्थिती 
पंजाबमध्ये १० जुलैपर्यंत लॉकडाऊन राहणार असला तरी काही निर्बंध शिथिल केले आहेत. बार, पब ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास अनुमती दिली. प. बंगालमध्ये खासगी आणि  सरकारी बसेस ५० टक्के क्षमतेने धावत आहेत. चालक, वाहकांना लसीकरण अनिवार्य आहे. सलून, पार्लर सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू आहेत. केरळमध्ये मुख्यमंत्री विजयन यांनी २४ जून रोजीच निर्बंध शिथिल केले. 

निर्बंध शिथिल करा
कोरोना परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. रुग्णांची व मृत्यूसंख्यादेखील कमी होत आहे. पूर्वीप्रमाणेच दर आठवड्याचे रुग्णसंख्येचे आकडे समोर ठेवून आढावा घ्यावा व निर्बंध कमी अधिक करावेत, अशी आमची मागणी आहे. 
    - बी. सी. भरतिया, अध्यक्ष, 
    कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स

व्यापाऱ्यांची रोजीरोटी, त्यांच्याकडील कामगारांना पगार, दुकानांचे भाडे व इतर गोष्टींचा आर्थिक मेळ साधण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी किमान रात्री ८ पर्यंत दुकाने उघडी ठेण्याची परवानगी द्यावी.
- वीरेन शहा, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशन
- राज्यातील तब्बल ३० जिल्हे हे तिसऱ्या स्तरामध्ये आहेत आणि त्यानुसार तेथे कडक निर्बंध लागू आहेत. 
- रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे, मृत्यूही बोटावर मोजण्याइतकेच आहेत, असे जिल्हे आणि जिथे हे आकडे झपाट्याने कमी झालेले नाहीत असे जिल्हे एकाच म्हणजे तिसऱ्या स्तरात आहेत. 
- कोरोनावर नियंत्रण मिळविणाऱ्या जिल्ह्यांनाही त्यामुळे निर्बंधांचा सामना करावा लागत आहे. 
 

Web Title: Trade open in other states, displeased with extra restrictions in Maharashtra; Extreme discomfort among professionals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.