बालभारतीच्या पाठीशी कामगार संघटना
By admin | Published: November 2, 2016 12:28 AM2016-11-02T00:28:11+5:302016-11-02T00:28:11+5:30
बालभारतीला संपवण्याचा राज्य शासनाचा डाव असल्याचा आरोप करत कामगार संघटनांनी त्यास कडाडून विरोध केला आहे.
पुणे : तब्बल ५० वर्षांपासून दर्जेदार पुस्तकांची निर्मिती करणाऱ्या बालभारतीला संपवण्याचा राज्य शासनाचा डाव असल्याचा आरोप करत कामगार संघटनांनी त्यास कडाडून विरोध केला आहे. केवळ कामगारांनीच नाही तर शिक्षणक्षेत्रात मनापासून काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षणतज्ज्ञांनी बालभारती वाचवण्यासाठी जन जनांंदोलन उभे केले पाहिजे, अशी अपेक्षा कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त करत बालभारतीच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडील (बालभारती) पुस्तक निर्मितीचे काम काढून घेण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेचे नामकरण ‘विद्या प्राधिकरण’ करून पुस्तकनिर्मितीचे काम विद्या प्राधिकरणाकडे दिले आहे. केवळ पाठ्यपुस्तकांची निर्मितीच नाही तर बालभारतीकडून इतरही विषयांवरील पुस्तकांची निर्मिती होते. मात्र, बालभारतीच्या विद्याशाखेतील सर्व लोकांची विद्या प्राधिकरणावर योग्य पदावर नियुक्ती केली जाणार आहे.
प्राधिकरणात नियुक्त केलेले लोक सेवानिवृत्त होईपर्यंत प्राधिकरणात कार्यरत राहणार आहेत. परंतु, त्यांचे वेतन व भत्ते बालभारतीकडून अदा केले जाईल, असे अध्यादेशाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. बालभारती आणि बालभारतीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हिताचा विचार करता
हा निर्णय अयोग्य आहे, असे
म्हणत बालभारती कर्मचारी कृती समिती, राष्ट्रवादी काँग्रेस कामगार संघटना, भारतीय मजदूर
संघाने बालभारतीचे विद्या प्राधिकरणात विलीनीकरण करण्यास विरोध केला आहे.
राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेकडून अभ्यासक्रम तयार करण्याची चौकट ठरविली जात होती. त्यानुसार बालभारतीकडून पुस्तक निर्मिती केली जात होती. परंतु, दोन्ही संस्था एकात्र केल्या तर दोघातील समन्वयाचा अभाव दूर होईल, हा एक फायदा होणार आहे. मात्र, अधिकाराचे केंद्रिकरण झाल्यास त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे, त्यामुळे दोन्ही संस्थांकडे स्वतंत्र कामकाज असावे, अशी मागणी संघटनांकडून केली जात आहे.
(प्रतिनिधी)
>बालभारतीचे अधिकार कमी करून या संस्थेचे अस्तित्व संपवण्याचा डाव रचला जात आहे. ही संस्था उभी करण्यासाठी साने गुरुजी, चित्रा नाईक, जे.पी. नाईक, शांता शेळके, द.मा. मिरासदार, शंकर पाटील आदींनी महत्त्वाचे योगदान दिले. संस्थेचे अस्तित्व संपवून या व्यक्तींचे महत्त्वही कमी केले जात आहे. त्यामुळे ही बाब गंभीरपणे घेऊन प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षकांनी व शिक्षणतज्ज्ञांनी जन आंदोलन उभे केले पाहिजे.
- उल्हास पवार, माजी आमदार आणि संस्थापक बालभारती कर्मचारी कृती समिती
बालभारतीला मोठा इतिहास आहे. ज्या कारणास्तव बालभारती सुरू झाली तेच आता संपुष्टात येणार आहे. मुलांच्या शैक्षणिक अस्तित्वासाठी बालभारती संस्था टिकली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शासनाच्या निर्णयाला कडाडून विरोध केला जाईल. तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन संघटनेची भूमिका त्यांना सांगितली जाईल.
- विकास दांगट, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस कामगार संघटना