'भारत बंद'ला पाठिंबा देण्याचे कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 03:56 PM2021-09-21T15:56:59+5:302021-09-21T15:57:29+5:30
मागील १० महिन्यांपासून देशातील शेतकरी मोदी सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी विरोधी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत.
नितिन पंडीत
भिवंडी: मागील १० महिन्यांपासून देशातील शेतकरी मोदी सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी विरोधी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. बड्या कॉर्पोरेट कंपन्यांना भारतातील शेती ताब्यात घेण्यासाठी मदत करणारेच हे तीन कायदे असून या कायद्यामुळे छोटे शेतकरी उध्वस्त होणार असून देशातील गरीब नागरिकांच्या जगण्याचा आधार असलेली रेशन व्यवस्था देखील पूर्णपणे नष्ट करणार आहेत.
हे नवीन कायदे बड्या कॉर्पोरेट्स कंपन्यांना जीवनावश्यक अन्नधान्याची साठेबाजी आणि काळा बाजार करण्याची खुली सूट देऊन महागाई वाढवण्याला हातभार लावणार असल्याचा आरोप विविध शेतकरी व कामगार संघाटांनी केला असून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी सोमवारी २७ सप्टेंबर २०२१ रोजी करण्यात येणाऱ्या भारत बंदला ठाणे जिल्ह्यासह भिवंडीतील व्यवसायिकांबरोबरच रिक्षा व टेक्सी चालकांनी देखील समर्थन देऊन २७ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजे पर्यंत आपली वाहने व दुकाने बंद ठेऊन या भारत बंद आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक विजय खाने , कॉ. बळीराम चौधरी ,ऍड. किरण चन्ने , कॉ. सुनील चव्हाण , कॉ रमेश जाधव व सदस्यांच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.
बड्या कॉर्पोरेट कंपन्यांना खूष करण्यासाठी मोदी सरकारने आधा अस्तित्वात असलेले सर्व कामगार कायदे रद्द केले आणि त्यांच्या जागी चार कामगार विरोधी श्रमसहिता आणल्या असल्याचा आरोप करत मोदी सरकारच्या धोरणांमुळे वीज, पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचे दर गगनाला भिडले असून अदानी, अंबानी, ऍमेझॉन आणि वॉलमार्ट यांची प्रचंड भरभराट होत आहे आणि छोट्या उद्योगधंद्यांना, दुकानदारांना मात्र नोटाबंदी आणि जीएसटीखाली चिरडले जाते आहे. बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत असून देशातील युवक, युवतीचे भवितव्य अंधारात असल्याचा आरोप देखील कृती समितीने जाहीर निवेदनात केला आहे.
मोदी सरकारने केलेले शेतकरी विरोधी, कामगार विरोधी, जनविरोधी कायदे आणि धोरणे रद्द करावेत या मागणीसाठी २७ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजे पर्यंत आपली वाहने व दुकाने बंद ठेऊन या भारत बंद आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.