व्यापारी रिंगणात
By admin | Published: January 17, 2017 04:19 AM2017-01-17T04:19:27+5:302017-01-17T04:19:27+5:30
भाजपा व शिवसेना या सत्ताधारी पक्षांना इंगा शिकवण्याकरिता व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी पालिकेत पाठवण्याकरिता काही जागा लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला
ठाणे : लोकसभा व विधानसभा निवडणुकांत ‘मोदीनामा’चा गजर केलेला ठाण्यातील व्यापारीवर्ग स्टेशन परिसर व अन्यत्र महापालिकेने केलेल्या तोड कारवाईमुळे तसेच रस्ते रुंदीकरणानंतर फेरीवाल्यांनी त्या जागेचा ताबा घेऊनही राजकीय पक्षांनी मिठाची गुळणी घेतल्याने नाराज झाला आहे. भाजपा व शिवसेना या सत्ताधारी पक्षांना इंगा शिकवण्याकरिता व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी पालिकेत पाठवण्याकरिता काही जागा लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
ठाणे महापालिकेने स्टेशन परिसर ते जांभळीनाका, घोडबंदर, कळवा आदी भागांत स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत रस्ता रुंदीकरण केले. त्यानंतर, स्टेशन परिसर तर ‘ना-फेरीवाला क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले. परंतु, पुन्हा या भागात फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढले. फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी वारंवार पालिकेकडे पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु, केवळ थातूरमातूर कारवाई केली. सत्ताधारी पक्षाने याबाबतीत मदत करण्याची मागणी केली. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून व्यापाऱ्यांची निराशा झाली. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला साथ दिली, म्हणून शिवसेनेने व्यापाऱ्यांना मदत नाकारली. त्यामुळे त्यांनी मदतीसाठी पुन्हा भाजपाकडे धाव घेतली. परंतु, पंतप्रधान मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पाकरिता सुरू असलेल्या कारवाईत भाजपाच्या नेत्यांनी हस्तक्षेप करणे टाळले. त्यातच पालिकेने आणखी पाच रस्त्यांच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव पुढे आणला. या प्रस्तावाला स्थायी समितीमध्ये विरोध झाला. हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. त्यानंतर शिवसेना, भाजपाच्या वतीने श्रेय लाटणारे बॅनर स्टेशन परिसर आणि नौपाडा परिसरात लावले होते. परंतु, त्यानंतर पालिका प्रशासनाने या दोन्ही सत्ताधारी पक्षांचा विरोध धाब्यावर बसवत या रस्त्यांचे रुंदीकरण होणारच, असा पवित्रा घेतल्याने व्यापारी हवालदिल झाले.
एकीकडे पालिकेचा बुलडोझर लक्षावधी रुपये खर्च करून बांधलेली दुकाने जमीनदोस्त करीत आहे. दुसरीकडे दुकाने पाडल्याने रुंदीकरण झालेले रस्ते फेरीवाल्यांनी व्यापले आहेत आणि नोटाबंदीच्या निर्णयानंतर व्यापारात मंदी आली आहे. अशा तिहेरी संकटातून सुटका होत नसल्याने व्यापारीवर्ग कमालीचा नाराज झाला आहे. त्यामुळे आता आमच्या समस्या आम्हीच सोडवू, असा नारा देत व्यापारी एकत्र आले आहेत. (प्रतिनिधी)
>व्यापाऱ्यांच्या समस्या सुटत नसल्यानेच आम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
- मितीश शहा, व्यापारी
>नौपाडा, घोडबंदरला पसंती
ज्या विभागात व्यापारीवर्ग अधिक आहे, असे ठाणे स्टेशन, नौपाडा, गोखले रोड, घोडबंदर, मानपाडा, कळवा आदी भागांत उमेदवार उभे करण्याचा निर्णय व्यापारीवर्गाने घेतला आहे.
यासंदर्भातील बैठक सोमवारी रात्री येथील एका हॉटेलमध्ये झाली. या बैठकीत महापालिकेची निवडणूक लढवण्याच्या मुद्यावर व्यापाऱ्यांचे एकमत झाले.