जीएसटीबाबत व्यापारीही गोंधळलेले
By admin | Published: July 2, 2017 05:02 AM2017-07-02T05:02:00+5:302017-07-02T05:02:00+5:30
शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून देशात लागू झालेल्या वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) मोठ्या उत्साहात स्वागत होत असले, तरी त्याबाबतच्या प्रत्यक्षातील
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून देशात लागू झालेल्या वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) मोठ्या उत्साहात स्वागत होत असले, तरी त्याबाबतच्या प्रत्यक्षातील व्यवहारांची नेमकी स्पष्टता नसल्याने, पहिला दिवस गोंधळलेल्या अवस्थेतच गेला. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच व्यावसायिक, व्यापारी, दुकानदारांमध्येही त्याबाबत संभ्रमावस्था कायम होती. दैनंदिन खरेदी-विक्रीचे काही प्रमाणात व्यवहार झाले असले, तरी नवी करप्रणाली समजण्यामध्ये गोंधळ उडत होता. सर्व व्यवहार
सुरळीतपणे पार पडण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागेल, असे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले.
शुक्रवारी रात्रीपर्यंत झुंबड असलेली इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने, अन्य दुकाने, मॉल शनिवारी मात्र ओस पडले होते. सोन्याच्या दुकानांमध्येही गर्दी नव्हती. मेडिकल्समध्ये बिल देताना गोंधळ उडत होता. काही औषधे स्वस्त, तर काही महाग झाल्याने, विक्रेते बिल बनविताना गोंधळलेले होते. याबाबत उच्च न्यायालयात जाण्याचा विचार करण्यात येत
असल्याचे केमिस्ट असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले.
जीएसटी लागू झाल्यावर कोणत्या वस्तू महागणार, कोणत्या स्वस्त होणार, याविषयी प्रसिद्धीमाध्यमातून काही माहिती मिळाली होती, पण प्रत्यक्षात तसेच आहे की नाही, हे माहीत नाही, अशी अनेकांची प्रतिक्रिया होती. त्यामुळे अंदाज घेण्यासाठी पहिल्या दिवशी खरेदी न केल्याचे दिसून आले.
शिवसेनेचा टोला
शिवसेनेने जीएसटीला पाठिंबा दिला आहे. मात्र, या करप्रणालीमुळे मुंबई महापालिकेतील जकातीवर मोठा परिणाम होणार असल्याने, त्याबद्दल काहीसा राग कायम असल्याचे शनिवारी त्यांनी दिलेल्या निवेदनातून स्पष्ट झाले.
मुंबईच्या जकात चौक्या आणि पोलीस हटविल्याने, मुंबईला सुरक्षेचे भगदाड पडले आहे. परिणामी, घातपात तर घडणार नाही ना? अशी चिंता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
जीएसटीची मिठाई भरवणाऱ्यांनो, काळजी घ्या. जल्लोष सुरू असताना, मुंबईत एखादा ‘कसाब’ राजरोस घुसू नये, यासाठी शिवसेना सरकारला सावध करत आहे, असे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे.