मस्तच! कांद्याला व्यापारी देत होते २ रुपये; मात्र, लोकांनी दिले ४ रुपये...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 07:50 AM2023-02-22T07:50:13+5:302023-02-22T07:50:19+5:30
गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमा भागातील शेतकरी हे मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेत आहेत.
शीतलकुमार कांबळे
सोलापूर : राज्यात अनेक ठिकाणी कांद्याला कमी दर मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाऊन अडत, हमाली, तोलाई यासाठी पैसे भरावे लागतात. त्यामुळे एका शेतकऱ्याने रंगभवन चौकात उभे राहून २०० रुपयांना ५० किलो म्हणजेच चार रुपये दराने कांदा विकला. असे ५० किलोंचे ५० पोते सर्वासमान्यांना विकून त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून समाधान व्यक्त केले.
गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमा भागातील शेतकरी हे मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेत आहेत. मात्र एकीकडे उत्पादन खर्च वाढला आहे तर दुसरीकडे दरात घट होत चालली आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांची परिस्थिती गंभीर आहे.
कांद्याला कमी भाव मिळत आहे. मार्केट यार्डात जाऊन हमाली, तोलाईला खर्च करावा लागतो. त्यापेक्षा शहरात रस्त्यावर विकण्याचा पर्याय स्वीकारला. आम्हाला चार पैसै मिळावे तसेच सामान्य लोकांना याचा फायदा व्हावा यासाठी रंगभवन चौकात २०० रुपयाला ५० किलोचे पोते विकले. - फिरोज बागवान, शेतकरी, दर्गनहळ्ळी, अक्कलकोट