‘वीर’ बसविण्याची परंपरा कायम
By Admin | Published: January 16, 2017 06:16 PM2017-01-16T18:16:31+5:302017-01-16T18:16:31+5:30
शिंदखेडा तालुक्यातील मालपूरसह परिसरात मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी ‘वीर’ व ‘वडद्ख्खीन’ बसविण्याचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 16 - शिंदखेडा तालुक्यातील मालपूरसह परिसरात मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी ‘वीर’ व ‘वडद्ख्खीन’ बसविण्याचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गावातून निघालेल्या मिरवणुकीने येथील ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.
मकर संक्रांत व अक्षय्यतृतीया नंतर येणाऱ्या दिवसाला कर व ताडापुरण अशी म्हणण्याची पूर्वापार परंपरा येथे आहे. या दिवशी ग्रामीण भागात पुरुष जर अपघाताने मृत्यू पावला असेल तर त्यांच्या आठवणीनिमित्त व कुटुंबाला दोष लागू नये म्हणून वीर बसवणे व आधी वीर बसवला असेल तर दर ४, ५ वर्षाच्या अंतराने त्याला उजविणे अशी पारंपारिक पद्धत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. यंदाही त्याच पद्धतीने गावातून मिरवणूक काढण्यात आली.
याच पद्धतीने स्त्री देखील अपघाती निधन होवून मरण पावली असेल तर ‘वडद्ख्खीन’ बसविणे हा कार्यक्रम होताना दिसून येतो. कर, ताडापुरण वीर, वडद्ख्खीन हे अहिराणी भाषेतील परिचित शब्द आहेत आणि याविषयी ग्रामीण भागात त्यांना अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे या होणाऱ्या कार्यक्रमातून दिसून येत होते.
मिरवणुकीने वेधले ग्रामस्थांचे लक्ष
यानिमित्ताने मालपूर गावातून पाषाणाच्या मूर्तीची सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. ठरलेल्या ठिकाणी भगत व त्यांचे वाजंत्रीधारक ‘डांक्या’ यांच्या मार्गदर्शनानुसार विधीवत स्थापना करुन पुरणपोळीचे नैवेद्यही दाखविण्यात आला.
नृत्याविष्काराने ग्रामस्थांचे मनोरंजन
शोभायात्रेला सुरुवात झाल्यानंतर पुरुषांनी अंगावर साडीचे पट्टा त्रिकोणी बांधून कंबरेला नंदीबैलाची गेज बांधला होता. तसेच अंगाला, कपाळाला कुंकवाचा मोठा ठसा व हातात काठी व त्या काठीच्या टोकाला लिंबू लावून केलेल्या पेहराव यांना ‘वीर’ शोभायात्रेत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्कारामुळे उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन झाले.