सोपान महाराजांनी व्यवसाय सांभाळत जपली परंपरा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 02:27 AM2019-11-20T02:27:02+5:302019-11-20T02:27:09+5:30
वारकरी संप्रदाय हळहळला
पंढरपूर (जि़सोलापूर) : संत नामदेव महाराज म्हणाले होते, आमुचा जन्म हा शिंप्याच्या कुळातला. हीच परंपरा त्यांचे सतरावे वंशज ह.भ.प. सोपान महाराज यांनीही जपली. त्यांच्या अपघाती निधनाने पंढरीतील शिंपी समाज आणि वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली होती. अनेकांनी आपली दुकाने मंगळवारी बंद ठेवली आणि त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आळंदी गाठली. नामदेव महाराज मंदिराच्या ठिकाणी मंगळवारी शोकमय वातावरण होते.
संत नामदेव महाराज पालखी सोहळ्याचे सर्व नियोजन सोपान महाराज पाहत असत. पंढरपूर येथे नामदेव मंदिरात होणाऱ्या विविध कार्यक्रमात त्यांची नियमित उपस्थिती असायची. धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेत असताना आपला शिंपी व्यवसायही त्यांनी सुरु ठेवला होता. बाहेरून आलेल्या आॅर्डरप्रमाणे घरांमध्ये ते कपडे शिवून देत असत. अपघातापूर्वी त्यांचे घरातील मंडळींचे बोलणे झाले
होते. सुरुवातीच्या काळात ते नामदेव मंदिराच्या ठिकाणी वास्तव्यास होते नंतर त्यांनी, श्री विठ्ठल मंदिराजवळील उत्तर द्वाराजवळ घर घेतले. सध्या त्याठिकाणी त्यांचे वास्तव्य होतं.
आळंदीत अंत्यसंस्कार
ह़भ़प़ सोपान महाराज हे पालखी सोहळ्यासह आळंदीकडे जात असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे आळंदी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच ठिकाणी त्यांची समाधी होणार आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये जाऊन अपघातातील जखमींची विचारपूस केली. सर्व १९ जखमी वारकऱ्यांच्या औषधोपचाराचा खर्च भाजप करणार असून मृतांच्या कुटुंबीयांना पक्षातर्फे प्रत्येकी ५ लाखांची मदत देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही जखमी वारकºयांची भेट घेतली.
नामदेव महाराजांच्या पायरीचे नित्य दर्शन
नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, वरी संत हिरे देती पाय! विठ्ठलाच्या प्रवेशद्वाराला नामदेव महाराजांची समाधी आहे. त्यास नामदेव पायरी असे संबोधले जाते.
त्या नामदेव पायरीचे सोपान महाराज नामदास हे रोज दर्शन घेत असत. त्यांचा हा नित्यनेम कधी चुकला नाही, असे वारकरी सांगतात.