मोबाइल अॅपमुळे पारंपरिक ज्योतिषी संकटात
By admin | Published: March 11, 2016 01:34 AM2016-03-11T01:34:08+5:302016-03-11T01:34:08+5:30
मुलीचं लग्न जमत नाही, घर घेणं होईना, आरोग्याच्या समस्या, चांगली नोकरी मिळेना, घरात शांती नाही, संतती होत नाही... अशा विविध समस्यांवर तोडगा शोधण्यासाठी फिरत्या
पिंपरी : मुलीचं लग्न जमत नाही, घर घेणं होईना, आरोग्याच्या समस्या, चांगली नोकरी मिळेना, घरात शांती नाही, संतती होत नाही... अशा विविध समस्यांवर तोडगा शोधण्यासाठी फिरत्या ज्योतिषांकडे रीघ लागत असे. इंटरनेट, सोशल मीडिया आणि विविध अॅपमुळे घरबसल्या विवाहमुहूर्त, जन्मकुंडली पाहणे शक्य झाल्याने त्यांच्याकडे जाणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे १०० ते १५० ज्योतिष सांगणारे आहेत. यातील काहीजण घरात, तर काहीजण कार्यालयात बसून ज्योतिष पाहण्याचे काम करतात. कोणी अंकशास्त्र, तर कोणी ज्योतिष अभ्यासाच्या आधारे भविष्यसुद्धा सांगतात.
इंटरनेटवर लग्नपत्रिका, बाळाचे नाव, मुहूर्त, जन्मकुंडली, नावानुसार भविष्य, वधू-वर विवाह जुळवणी पत्रिका, जन्मांकावरून भविष्य आदी अॅपमुळे सर्व भविष्यच एका क्लिकवर उपलब्ध झाले आहे. त्यामुळे ज्योतिष शास्त्रावर विश्वास ठेवणारे नागरिक, तरुणवर्ग हा आॅनलाइनच पत्रिका पाहू लागला आहे. इंटरनेट अॅपमुळे पारंपरिक ज्योतिषी संकटात सापडले आहेत. काही नागरिक रोजचे रोज तसेच वार्षिक भविष्य पाहतात. काही जण तर वारंवार वधू-वर गुणमिलनाचे ज्योतिष पाहतात. त्याचप्रकारे व्रतवैकल्य, सण-उत्सव वेगवेगळे मुहूर्त याची माहितीही ज्योतिषाकडे पाहिली जाते. अलीकडच्या काळात मुहूर्त पाहून कामाचा प्रारंभ करणारे कमी झाले आहेत. ज्येष्ठ मंडळी तसेच रुढी, परंपरा पाळणाऱ्यांना ज्योतिषशास्त्राचे आकर्षण आहे.
सुरुवातीला काही ज्योतिष भविष्य सांगण्यासाठी अगदी अकरा रुपयांपासून शुल्क घेत असत. फिरून ज्योतिष सांगणारे १०१ किंवा २५१ रुपये दक्षिणा घेत आहेत. तर नामवंत ज्योतिषांची दक्षिणा हजार रुपयांच्या पटीत आहे. काही भविष्य सांगणारे तर एका प्रश्नाला तीन हजार रुपये दक्षिणा घेतात. मुलगा किंवा मुलगी उच्चशिक्षित असेल, तर आई वडिलांच्या समाधानासाठी इंटरनेटच्या माध्यमातून घरातच पत्रिका पाहून स्वत:च आई-वडिलांची समजूत घालू लागले आहेत. दारोदारी फिरून ज्योतिष सांगणाऱ्या दोन भावांनी सांगवीत राहत्या खोलीत आत्महत्या केली. आर्थिक विवंचनेत असल्याने आत्महत्येचा मार्ग पत्करला असे त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले होते. ठिकठिकाणी फिरून भविष्य सांगणाऱ्या या दोन ज्योतिषांचे उदरनिर्वाहाचे हेच साधन होते. हे साधनच उदरनिर्वाहासाठी अपुरे पडल्याने त्यांनी जीवन संपविण्याचा निर्णय घेतल्याचा प्रत्यय या घटनेतून आला आहे. (प्रतिनिधी)
> अंकज्योतिष हे इंटरनेटवर पाहणे सुलभ झाले आहे. लग्नपत्रिका आणि जन्मपत्रिका आता अगदी सोप्या पद्धतीने नेटवरून मिळू लागली आहे. त्यामुळे अर्थातच भविष्य सांगणाऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. रोज एक तरी नवीन अॅप विकसित होत आहे. मात्र, ग्रहांचा मानवी जीवनावर होणार परिणाम हे सांगण्यासाठी ज्योतिषाचा अभ्यास असलेली व्यक्ती महत्त्वाची वाटत असल्याने काहीजण अशा व्यक्तींची प्रत्यक्ष भेट घेतात.
- यादवेंद्र जोशी, संगणकतज्ज्ञ