‘पर्ससीन’मुळे पारंपरिक मच्छिमार मेटाकुटीस
By admin | Published: November 26, 2014 11:46 PM2014-11-26T23:46:06+5:302014-11-27T00:12:18+5:30
नौका पकडल्या : रापणकर संघाकडून विचारणा
मालवण : किनाऱ्यानजीक अनधिकृतरीत्या मासेमारी करणाऱ्या कोचरे-निवती येथील दोन मिनी पर्ससीन नौकांना देवबाग येथील रापणकर संघाच्या मच्छिमारांनी पकडून किनाऱ्यावर आणले. ही घटना आज, बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली. स्थानिक रापण संघाच्या मच्छिमारांना मत्स्य दुष्काळाचा फटका बसत असतानाच पर्ससीन नौकांच्या अतिक्रमणाने पारंपरिक मच्छिमार मेटाकुटीस आले आहेत. याच रागातून पकडून आणलेल्या नौकांच्या मालकांना याचा जाब विचारण्यात आला. यामुळे काहीकाळ देवबाग किनाऱ्यावर वादाची परिस्थिती निर्माण झाली होती.
याबाबतची अधिक माहिती अशी की, आज दुपारपासून देवबाग समुद्रकिनाऱ्यानजीक १० ते १५ मिनी पर्ससीन नौका मासेमारी करीत होत्या. मासेमारी करीत असतानाच त्यांनी देवबाग किनाऱ्यानजीक अतिक्रमण केल्याने स्थानिक रापणकर मच्छिमार किनाऱ्यावर जमा झाले. पारंपरिक मच्छिमारांच्या तोंडचा घास हिरावून नेणाऱ्या पर्ससीन नौकांवर कारवाई झालीच पाहिजे. त्यांना जरब बसावी, या उद्देशाने पारंपरिक रापण संघाच्या मच्छिमारांनी त्यांचा समुद्रात पाठलाग केला.
समुद्रात झालेल्या धरपकडीत कोचरे निवती येथील दोन मिनी पर्ससीन नौकांना पकडण्यात स्थानिक मच्छिमारांना यश आले. यावेळी झालेल्या पाठलागात अन्य पर्ससीन नौका पळून जाण्यात यशस्वी झाल्या.
पर्ससीन नौकांना पकडून किनाऱ्यावर आणल्यानंतर त्याठिकाणी बांदेकर रापण संघ, राऊळ रापण संघ, कासवकर रापण संघ व सीमाव रापण संघाचे मच्छिमार, तसेच दांडी येथील मच्छिमार मोठ्या संख्येने जमा झाले होते. पकडून आणलेल्या मच्छिमारांवर कोणती कारवाई करावी, याबाबत उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. या दरम्यान संतापलेल्या मच्छिमारांनी आर-पारचा लढा जवळ आल्याचे सांगत नौकांच्या मालकांना जाब विचारला.
यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मच्छिमारांना शांत राहण्याचे आवाहन केले. आपापसांतील वाद सामंजस्याने मिटवा. कायदा व सुव्यवस्था बिघडवू देऊ नका; अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल, अशा सूचना पोलिसांनी केल्या. (प्रतिनिधी)
वाद उफाळणार
दिवसाढवळ्या किनाऱ्यानजीक येऊन मासेमारी करणाऱ्या मिनी पर्ससीन नौकांवर शासन कोणतीच कारवाई करत नसल्यामुळे स्थानिक मच्छिमारांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. याचेच पर्यवसान आजच्या धरपकडीत झाले.