वाहतूकदारांचे चक्काजाम आंदोलन मागे; इंधन दरवाढ, जीएसटीवर केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 04:19 AM2017-10-11T04:19:19+5:302017-10-11T04:19:28+5:30
जीएसटीतील जाचक अटी आणि इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर दोन दिवस चक्काजाम आंदोलन केल्यानंतर, मंगळवारी पेट्रोलियम मंत्रालय आणि रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्रालयाच्या सहसचिवांनी आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या
मुंबई : जीएसटीतील जाचक अटी आणि इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर दोन दिवस चक्काजाम आंदोलन केल्यानंतर, मंगळवारी पेट्रोलियम मंत्रालय आणि रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्रालयाच्या सहसचिवांनी आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या (एआयएमटीसी) शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलाविले. या वेळी सकारात्मक चर्चा झाल्याने, सायंकाळी ८ वाजता चक्काजाम आंदोलन मागे घेतल्याची माहिती बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सचिव जितेंद्र पारिख यांनी दिली.
केंद्र सरकारसोबत चर्चेस उपस्थित असलेल्या एआयएमटीसीच्या कोअर कमिटीचे अध्यक्ष बाल मल्कित सिंग यांनी सांगितले की, पुढील आठवड्यात रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्रालयासोबत मागण्यांवर सविस्तर चर्चा होईल. मंगळवारच्या बैठकीत पेट्रोलियम आणि रस्ते व वाहतूक मंत्रालयाच्या सहसचिवांनी वाहतूकदारांचे प्रश्न ऐकून घेतले. त्यात पेट्रोलियम मंत्रालयाचे सहसचिव आशुतोष जिंदल यांनी इंधन दरवाढीसंदर्भात वित्त विभागासोबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले. देशात एकच इंधन दर आणि इंधनांना जीएसटीच्या कक्षेत आणण्याबाबत शासन विचाराधीन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जीएसटीबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य महेंद्रकुमार यांनी दिले आहे.
परिणामी, दिवाळीपर्यंत मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे कोअर कमिटीने ठरविले आहे. दिवाळीपर्यंत खूशखबर देण्याचे सहसचिवांनी आश्वासित केले आहे. दरम्यान, वाहतूकदारांच्या दोन दिवसीय चक्काजाम आंदोलनामुळे, ४ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा संघटनेने केला आहे.