वाहतूकदारांचे आंदोलन टॉप गिअरवर
By admin | Published: October 5, 2015 12:23 AM2015-10-05T00:23:14+5:302015-10-05T00:25:55+5:30
आर्थिक नाडी आवळली : ३०० कोटींची उलाढाल ठप्प; चक्का जामचा चौथा दिवस; सरनोबतवाडीजवळ वाहतूक अडविली
कोल्हापूर : देशातील टोलनाके बंद करावेत यासह विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत चक्का जाम आंदोलनाच्या चौथ्या दिवशी रविवारी पुणे-बंगलोर महामार्गावरील सरनोबतवाडीजवळ परराज्यांतून येणारे सुमारे १०० मालवाहतूक ट्रक कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अडविले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही ठप्प झाली.
१ आॅक्टोबरपासून आॅल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसने हे देशव्यापी आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ३०० कोटी रुपयांच्या उलाढालीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, बुधवारी (दि. ७) महाराष्ट्र खासगी बसवाहतूक संघटनेने या बेमुदत चक्का जाम आंदोलनाला पाठिंबा म्हणून बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
टोलमधून जेवढी रक्कम जमा होते ती एकरकमी आगाऊ देण्यास वाहतूकदार तयार आहेत. वार्षिक टोल परमिट द्यावे, वाहतूक भाड्यातून टी. डी. एस. कपात होतो, तो रद्द करावा, या मागणीसाठी मालवाहतूक मालकांनी बेमुदत चक्क जाम आंदोलन सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी दुपारी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सरनोबतवाडीजवळ दुतर्फा मार्गावर चक्का जाम आंदोलन केले. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली. नंतर मालवाहतूक वाहने रस्त्याच्या एका बाजूला घेऊन थांबविली. त्यानंतर मुडशिंगी (ता. करवीर) येथील एका सिमेंट विक्रेत्याच्या दुकानाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावले. त्याचबरोबर शिरोली-नागाव या औद्योगिक वसाहतीमधून सिमेंट व शीतपेयांची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या टायरमधील हवा सोडण्यात आली.
या बेमुदत चक्का जाम आंदोलनाचा परिणाम ज्वारी, कडधान्ये या जीवनावश्यक वस्तूंवर झाला आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात तयार होणारी साखर, गूळ-रवे यांची परजिल्ह्यांत जाणारी वाहतूक बंद झाली आहे. त्याचबरोबर नागपूरहून येणारे दगडी कोळसा, स्टील तसेच महाराष्ट्रातील शेजारच्या राज्यांतून येणारी मालवाहतूक बंद झाली आहे. तसेच रोज इचलकरंजीहून ६० ते ७० ट्रक कपड्यांची वाहतूक राजस्थान, गुजरात याठिकाणी होते. पण, सध्या या आंदोलनामुळे ही वाहतूक पूर्णपणे बंद आहे.
जिल्ह्यात शिरोली, नागाव एमआयडीसी, उचगाव, गांधीनगर, गोकुळशिरगाव, कागल या ठिकाणी पाचशे ट्रान्स्पोर्ट आहेत. तर १६ हजार ट्रक, १ हजार टँकर, १२ टेम्पो आहेत. हे सर्वजण आंदोलनात सहभागी आहेत..
ट्रक, टेम्पो, टँकर ही वाहने बंद असल्यामुळे शहरातील पेट्रोल पंपांवर सुमारे ५० टक्के, तर नाक्याबाहेरील पंपांवर ७५ टक्के डिझेल विक्रीवर परिणाम जाणवत आहे. सध्या जिल्ह्यात सुमारे ३०० पेट्रोलपंप आहेत.
-गजकुमार माणगावे, अध्यक्ष, जिल्हा पेट्रोल-डिझेल असोसिएशन.
तीन दिवसांपासून गॅसचा तुटवडा जाणवलेला नाही. पुढील दोन-तीन दिवसांत गॅसटंचाई भासेल असे मला वाटत नाही. मात्र, कंपनीकडे दोन-तीन ट्रक सिलिंडरची मागणी केल्यावर फक्त एकच ट्रक सिलिंडर पाठविली जातात.
- शेखर घोटणे, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा गॅस वितरक संघटना.
शासनाने मालवाहतूक गाड्यांना टोल मधून वगळावे, यासाठी हे देशव्यापी आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात सर्व वाहतूक चालक मालक सहभागी आहेत, आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन तीव्र करणार.
- योगेश रेळेकर,अध्यक्ष शिरोली नागांव एमआयडीसी लॉरी, असो.
टोलसाठी साडेबारा हजार
एका ट्रकचालकाला कोल्हापूर-अहमदाबाद पुन्हा कोल्हापूर अशा एका खेपेला सुमारे १२ हजार ५०० रुपये टोलसाठी द्यावे लागतात. यासाठी एका टनाच्या मालाला सुमारे ११०० रुपये भाडे आकारले जाते. साधारणत: १२ चाकी ट्रकमधून २० ते २२ टन माल नेला जातो. याचा सरासरी विचार केला तर प्रत्यक्षात एका किलोमीटरला सात रुपये टोल दिला जातो.
डिझेलवर सेस कर
ट्रक, टॅँकरचालक डिझेलवर प्रतिलिटर सहा रुपये सेस कर व रस्तेकर सरकारला देतात. पण, सरकार कोणतीही मूलभूत सुविधा (उदा. राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर पार्किंग व विश्रामगृह, आदी) ट्रकचाल
कांना देत नाही, अशी ओरड ट्रकचालकांतून होत आहे.
टोलद्वारे वाहतुकदारांची ४१ हजार कोटींची लूट
सुभाष जाधव : तब्बल ८७ हजार कोटींचे इंधन वाया
शिरोली : देशात एकूण ३७२ टोलनाके आहेत, तर सुमारे ९० लाख गाड्या रोज देशभर दळणवळणात सक्रीय असतात. या टोलमधून शासनास ५५ हजार कोटी रुपये मिळतात. पण, माहिती अधिकारामधून काढलेल्या माहितीद्वारे सरकार १४ हजार ५०० कोटी रुपये दाखविते. त्यामुळे सुमारे ४१ हजार कोटींची लूट टोलमधून होते. ही लूट थांबवावी, अशी मागणी वाहतूकदारांची असल्याची माहिती लॉरी आॅपरेटर असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष सुभाष जाधव यांनी दिली.
जाधव म्हणाले, रोड टॅक्सच्या रूपाने शासनाच्या तिजोरीत वर्षाला हजारो कोटी रुपये जमा होतात. तसेच टोलमधून १४ ऐवजी १५ हजार कोटी रुपये जमा करण्यास आम्ही तयार आहोत, पण टोलमधून मालवाहतूक गाड्यांना वगळावे कारण टोल देण्यासाठी नाक्यावर थांबल्यानंतर वर्षाला सुमारे ८७ हजार कोटी रुपयांचे इंधन खर्च होते व वेळही वाया जातो. म्हणूनच आॅल इंडिया ट्रान्स्पोर्ट लॉरी असोसिएशन काँग्रेसचे अध्यक्ष भीम वधवा आणि जी. आर. शन्मुगाप्पा यांच्या माध्यमातून हा देशातील पहिला लॉरी असोसिएशनने देशव्यापी संप पुकारला आहे .
गेल्या पाच दिवसांपासून देशातील साखर, सिमेंट, मद्य, मार्बल मार्केट, वाळू मार्केट, टायर गोडावून, कापड, इंडस्ट्रीयल, कोळसा, कांदा बटाटा, कडधान्ये, लॉजेस्टिक, आदी माल गोदामात आहे त्या ठिकाणी आहे तर पेट्रोल आणि डिझेल असोसिएशनबाबतही बोलणे झाले असून तेही टँकर बंद ठेवून या आंदोलनात सहभागी होतील.
देशव्यापी आंदोलन सुरू असताना जर बाहेरून माल घेऊन मालवाहतूक गाड्या आल्या तर त्या गाडीची हवा सोडून गाडी चालकाला गांधीगिरी पद्धतीने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येते तसेच त्यांना एक हजार ते अडीच हजार रुपये दंड केला जातो, तसेच जिल्ह्यात जेवढे गोदाम आहेत त्या गोदामातील अधिकारी आणि कर्मचारी यांना लॉरी असोसिएशनतर्फे या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले जात आहे.
सध्या केंद्रात मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे, पण आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आंदोलन बेमुदत सुरू राहणार, असे जाधव म्हणाले.