वाहतूक पोलिसांचा ‘धमाका’
By admin | Published: November 2, 2016 03:53 AM2016-11-02T03:53:19+5:302016-11-02T03:53:19+5:30
मुंबई वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून दंड आकारण्याच्या कारवाईला आॅक्टोबर महिन्यात सुरुवात केली.
मुंबई : वाहतुकीचे नियम मोेडणाऱ्या वाहनचालकांना जरब बसावी, यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून दंड आकारण्याच्या कारवाईला आॅक्टोबर महिन्यात सुरुवात केली. या कारवाईचा वेग वाढत असून दिवाळीच्या दिवसांत वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांवर चांगलाच चाप लावण्यात आला आहे. २८ आॅक्टोबर ते ३१ आॅक्टोबरपर्यंत ४ हजार ९८0 वाहन चालकांवर कारवाई केल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
मुंबईत नुकतेच ४ हजार ७१७ सीसीटीव्ही बसवण्यात आले. या सीसीटीव्हींद्वारे वाहतूक नियमन करतानाच नियम मोडणाऱ्या चालकांविरोधात दंडात्मक कारवाई करणे सोपे जात आहे. यासाठी सीसीटिव्ही चालान प्रक्रिया राबवण्याचा निर्णय मुंबई वाहतूक पोलिसांनी घेतला आणि त्याची ४ आॅक्टोबरपासून मुंबईत अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली.
एखाद्या वाहनचालकाने सिग्नल मोडल्यास, झेब्रा क्रॉसिंग ओलांडून उभे राहिल्यास किंवा बेदरकारपणे वाहन चालवल्यास तसेच विनाहेल्मेट दुचाकी चालवल्यास ते वाहन सीसीटीव्हीत कैद होत आहे. नियंत्रण कक्षात असणाऱ्या आॅपरेटरकडून त्या वाहनाची नंबरप्लेटही सीसीटीव्हीत त्वरित कैद होते आणि चालकाच्या मोबाइलवर दंडात्मक कारवाईचा एसएमएसही केला जातो. ही माहिती मिळताच वाहनचालकांकडून क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे त्या ठिकाणी असणाऱ्या वाहतूक पोलिसाकडे दंड भरण्यात येत आहे. दंड न भरल्यास चालकाच्या घरापर्यंत ही माहिती पोहोचवली जात आहे. या कारवाईला सुरुवात करताच वाहन चालकांना चांगलीच जरब बसली आहे.ऐन दिवाळीतही ही कारवाई केली असून, २८ आॅक्टोबर ते ३१ आॅक्टोबरपर्यंत ४ हजार ९८0 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. सर्वात अधिक कारवाई २८ आॅक्टोबर रोजी केली असून जवळपास २ हजार ४४७ वाहन चालक सीसीटीव्हीच्या जाळ्यात अडकले. गेल्या चार दिवसांत केलेल्या कारवाईत सर्वाधिक कारवाई झेब्रा क्रॉसिंग तसेच सिग्नलचे नियम मोडणाऱ्यांविरोधात केली आहे. त्यानंतर विनाहेल्मेट कारवाईचा नंबर लागतो. दक्षिण मुंबईत सर्वात जास्त कारवाई झाली आहे. (प्रतिनिधी)
>चालकाला नियम मोडल्याचा फोटोही लगेच पाठवला जात आहे.
तारीख, वेळ व ठिकाणांचीही माहिती त्याला पाठवण्यात येत आहे.
चालकाला क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे दंड भरावयाचा असल्यास वाहतूक पोलिसाकडे हाताळण्यात येणाऱ्या पीओएस मशिनद्वारे सहज भरू शकतो.
या मशिनमध्ये कार्ड स्वाइप करून दंड भरता येतो.
>४ दिवसांतील कारवाई
२८ आॅक्टोबर-२,४४७ केसेस
२९ आॅक्टोबर- १,४४९ केसेस
३0 आॅक्टोबर- ४१४ केसेस
३१ आॅक्टोबर-६७0 केसेस
>३0 आणि ३१ आॅक्टोबर रोजी काही सीसीटीव्हींमध्ये तांत्रिक समस्या उद्भवली होती. त्यामुळे या दिवशी कारवाई कमी झाल्याचे सांगण्यात आले. मात्र आता सीसीटीव्ही व्यवस्थित कार्यरत आहेत.