वाहतूक पोलिसांचा ग्रीन कॉरिडॉर : ७.८ किमीचे अंतर ६.३० मिनिटांत पार

By admin | Published: April 27, 2016 12:59 AM2016-04-27T00:59:28+5:302016-04-27T00:59:28+5:30

रुबी हॉल क्लिनिक ते लोहगाव विमानतळ हा ७.८ किलोमीटरचा मार्ग... वाहनांची प्रचंड गर्दी असलेला... विमानतळापर्यंत हृदय पोहोचविण्यास अत्यंत कमी वेळ..

Traffic Police Green Corridor: Crossing 7.8 km distance in 6.30 minutes | वाहतूक पोलिसांचा ग्रीन कॉरिडॉर : ७.८ किमीचे अंतर ६.३० मिनिटांत पार

वाहतूक पोलिसांचा ग्रीन कॉरिडॉर : ७.८ किमीचे अंतर ६.३० मिनिटांत पार

Next

पुणे : रुबी हॉल क्लिनिक ते लोहगाव विमानतळ हा ७.८ किलोमीटरचा मार्ग... वाहनांची प्रचंड गर्दी असलेला... विमानतळापर्यंत हृदय पोहोचविण्यास अत्यंत कमी वेळ... पण वाहतूक पोलीस ही जबाबदारी उचलतात... नियोजन केले जाते... मार्गावर कोंडी फोडण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते... त्यानुसार हृदयाचा प्रवास सुरू होतो... कोणत्याही अडथळ््याशिवाय एक-एक टप्पा पार करून हा मार्ग केवळ ६.३० मिनिटांत पार केला जातो... विमानाने हे हृदय दिल्लीला रवाना होते...
अपघात झालेल्या खेड तालुक्यातील ३३ वर्षीय तरुणाला रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मेंदू मृत झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. त्यांचे इतर अवयव सुस्थितीत असल्याने डॉक्टरांनी त्याच्या नातेवाइकांना अवयव दानाचे महत्त्व पटवून दिले. नातेवाइकांनीही मग याचा सकारात्मक विचार करून अवयवदानास होकार दर्शविला. त्यानुसार येथील डॉक्टरांनी अवयव दानासाठी इतर रुग्णालयांत चाचपणी सुरू केली. या रुग्णाच्या नातेवाइकांनी त्याचे हृदय, दोन्ही मूत्रपिंड, दोन्ही डोळे, यकृत हे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हृदय दिल्ली येथील एम्स रुग्णालयातील एका रुग्णाला हृदयाचे प्रत्यारोपण करायचे निश्चित झाले. त्यासाठी तेथील डॉक्टरांचे एक पथक रुबी हॉलमध्ये दाखल झाले.
हृदयाचे प्रत्यारोपण करण्यासाठी अत्यंत कमी कालावधी असतो. त्यामुळे हे हृदय रुबी हॉल क्लिनिकपासून लोहगाव विमानतळापर्यंत कमी कालावधीत पोहोचविणे अत्यंत आवश्यक होते. त्यासाठी वाहतुक पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. शस्त्रक्रिया करून दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी या हृदयाचा प्रवास सुरू झाला. रुबी हॉल क्लिनिकपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतू, गुंजन टॉकीज, जेल रोड हा ७.८ किलोमीटरचा मार्ग निश्चित करण्यात आला होता. यासाठी आवाड यांच्यासह वाहतूक शाखेचे दोन सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक, चार सहायक पोलीस निरीक्षक आणि ३२ कर्मचाऱ्यांनी हे आव्हान स्वीकारले. हृदय घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला वाहतुकीचा अडथळा होऊ नये म्हणून ठिकठिकाणी पोलिसांनी खडा पहारा करून रस्ता मोकळा करून दिला. वाहतूक विभागाने तयार केलेल्या ग्रीन कॉरिडॉरमुळे कोणत्याही अडथळ््याशिवाय हृदयाचा विमानतळापर्यंतचा प्रवास अवघ्या ६.३० मिनिटांत पूर्ण झाला. रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. शीतल धडफळे, डॉ. मनीष शर्मा आणि सुरेखा जोशी यांनी यात सहभाग घेतला होता. (प्रतिनिधी)
>चौघांना जीवदान, तर दोघांना मिळणार दृष्टी
मेंदू मृत झालेल्या तरूणाच्या नातेवाइकांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतल्याने चौघांना जीवदान, तर दोघांना दृष्टी मिळणार आहे. या तरूणाचे हृदय दिल्लीतील एम्स रुग्णालयातील एका रुग्णाला दिले जाणार आहे. तर, एक किडनी चिंचवड येथील एका रुग्णालयातील रुग्णाला दिली जाईल. दोन डोळे, एक किडनी आणि यकृताचे प्रत्योरोपण रुबी रुग्णालयातील रुग्णांमध्ये केले जाणार आहे. त्यामुळे या अवयवदानांमुळे चौघांना जीवनदान मिळणार आहे. तर, दोघांच्या जीवनाला नवी दृष्टी मिळणार आहे.

Web Title: Traffic Police Green Corridor: Crossing 7.8 km distance in 6.30 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.