वाहतूक पोलिसांच्या वाहनांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2016 01:14 AM2016-08-06T01:14:34+5:302016-08-06T01:14:34+5:30
शहरातील वाहतुकीचा भार सांभाळण्यासाठी पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, चतु:शृंगी, हिंजवडी वाहतूक विभागाच्या वतीने प्रयत्न केले जातात़
पिंपरी : शहरातील वाहतुकीचा भार सांभाळण्यासाठी पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, चतु:शृंगी, हिंजवडी वाहतूक विभागाच्या वतीने प्रयत्न केले जातात़ मात्र, सरकारच्या आणि मोटार परिवहन विभागाच्या दुर्लक्षामुळे वाहतूक विभागाची वाहने वापरालायक राहिली नाहीत. दुचाकींसह मोटारगाड्यांच्या दयनीय अवस्थेमुळे वाहतूक शाखेच्या वाहतूक नियमनाच्या कामात अडचणी येत आहेत.
रात्रीच्या वेळी गस्त घालताना अनेक वेळा दुचाकी बंद पडतात. त्यामुळे वाहतूक विभागाच्या अशा अवस्थेला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ शहरातील मोटर परिवहन विभागाकडे दुरुस्तीला दिलेल्या दुचाकी गाड्यांचे पार्ट्स उपलब्ध होत नाही़ परिणामी दहा ते पंधरा दिवस दुचाकी मोटार परिवहन विभागाकडे पडून राहतात. एकतर दुचाकी संख्या कमी आणि त्यात दुरुस्तीला पाठविलेले वाहन यामुळे कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांना कोणते वाहन पेट्रोलिंगला न्यावे,असा प्रश्न पडत आहे़
पिंपरी वाहतूक विभागाकडे एकूण पाच दुचाकी आणि एक चारचाकी गाडी आहे़ परिसरातील अनेक विभागात लक्ष ठेवताना दुचाकी गाड्यांचा नादुरुस्तपणा वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढवत आहे़ काही दुचाकी गाड्यांचे टायर झिजल्यामुळे गाडी चालवताना घसरून पडण्याचा धोका संभवत आहे़ अचानक उद्भवलेल्या प्रसंगांना तोंड देण्यासाठी पिंपरी विभागाला जादा दुचाकींची आवश्यकता आहे़
गाडीचा हॉर्न, इंडिकेटर, ब्रेकलाइट, क्लचच्या समस्यांमुळे वाहतूक पोलिसांना त्रास सहन करावा लागत आहे़
चिंचवड वाहतूक विभागाकडे एक दुचाकी आणि एक चारचाकी वाहन आहे़ गुन्हेगाराचा पाठलाग करताना अनेक वेळा दुचाकी बंद पडल्यामुळे रात्रीचे गैरप्रकार थांबविण्यासाठी जादा गाड्यांची आवश्यकता आहे़ विभागातील चारचाकी गाडीचा इंडिकेटर तुटलेला आहे़ अनेक ठिकाणी गाडीचा बाह्यभाग चेंबलेला आहे़ अशा गाड्यांमुळे पोलिसांना मनस्ताप सहन करावा लागत आहे़
निगडी वाहतूक विभागाकडे तीन दुचाकी आहेत़ वाहतूक विभागाची अपघातग्रस्त चारचाकी गाडी तीन महिन्यांपूर्वीपासून मोटार परिवहन विभागाकडे दुरुस्तीसाठी पडून आहे़ गाडीचा पार्ट मिळत नसल्याने ती अद्याप दुरुस्त झाली नाही़ त्यामुळे वाहतूक पोलिसांना पदरमोड करून वैयक्तिक वाहन वापरावे लागत आहे़
भोसरी वाहतूक विभागाकडे सहा दुचाकी आणि एक चारचाकी वाहन आहे़ काही दुचाकींचे टायर खराब झाले आहेत, तर काही दुचाकींचे हॉर्न, ब्रेक, इंडिकेटर नादुरुस्त आहेत. दुचाकींची कमतरता, त्यातही नादुरुस्त दुचाकींमुळे पोलिसांना गस्त घालणे, तसेच गुन्हा घडला त्या ठिकाणी जाणे अडचणीचे ठरू लागले आहेत.
चतु:शृंगी वाहतूक विभागाकडे चार दुचाकी आणि एक चारचाकी वाहन आहे़ दुचाकींचे टायर बदललेले नसल्यामुळे आणि वाहनांच्या दुरुस्तीच्या कारणास्तव वाहतूक विभागाकडे फक्त नावालाच वाहन दिसून येत आहे़ (वार्ताहर)
>प्रतीक्षा : पोलिसांना नव्या वाहनांची
वाहतूक पोलिसांनी ‘नो पार्किंग’च्या ठिकाणी कारवाई केलेल्या दुचाकी जवळच्या पोलीस ठाण्यात घेऊन जायचे असल्यास, वरिष्ठांची परवानगी घेऊन वाहतूक करणाऱ्या टेम्पोची मागणी करावी लागत आहे़ शहरातील प्रत्येक वाहतूक विभागाला आठवड्यातून एकदाच वाहतूक टेम्पो मिळत आहे़ परिणामी, दुचाकी वाहनांना ‘जॅमर ’लावण्याची वेळ पोलिसांवर आली आहे़
सरकारी पातळीवरून आणि मोटार परिवहन विभागाच्या वतीने वाहतूक शाखेच्या प्रत्येक विभागाला आवश्यकतेनुसार दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा पुरवठा होणे गरजेचे आहे़ दिवसेंदिवस शहराची वाढणारी लोकसंख्या, वाहने यांमुळे वाहतूक शाखेच्या गाड्यांच्या दुरुस्तीबरोबरच नवीन वाहनांचीही गरज असल्याचे निदर्शनास येते.
हिंजवडी वाहतूक विभागाकडे चार दुचाकी आणि एक चारचाकी वाहन आहे़ एक दुचाकी मोटर परिवहन विभागाकडे दुरुस्तीला पाठविली असल्याने रात्रीच्या पेट्रोलिंगसाठी पोलिसांना वैयक्तिक गाडीचा वापर करावा लागत आहे़ अनेक दुचाकी चालविण्याच्या अवस्थेत नाहीत. खराब अवस्थेतील याच दुचाकी नाईलाजास्तव वापराव्या लागत आहेत.