वाहतूक पोलिस विलास शिंदे यांचे निधन, दुचाकीस्वाराने केली होती मारहाण
By admin | Published: August 31, 2016 02:05 PM2016-08-31T14:05:29+5:302016-08-31T15:32:45+5:30
दुचाकीस्वारांकडून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेले वाहतूक पोलिस कर्मचारी विलास शिंदे यांचे बुधवारी दुपारी लिलावती रुग्णालयात निधन झाले.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - डयुटी बजावत असताना दुचाकीस्वाराकडून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेले वाहतूक पोलिस कर्मचारी विलास शिंदे यांचे बुधवारी दुपारी लिलावती रुग्णालयात निधन झाले.
वाहतूक पोलिसांकडून सध्या मुंबईतील सगळया वाहनांची माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी प्रत्येक पेट्रोल पंपावर एक वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्यात आली आहे. मागच्या मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी खार एसव्ही रोडवरील पेट्रोल पंपावर डयुटीवर बजावत असताना विलास शिंदे यांनी तिथे आलेल्या दुचाकीस्वाराकडे त्याच्या गाडीची माहिती मागितली.
पण शिंदे यांना माहिती देण्यास दुचाकीस्वाराने नकार दिला. दोघांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. त्यांनी दुचाकीस्वाराला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन जायची धमकी दिली. त्यानंतर संतापलेल्या दुचाकीस्वाराने शिंदे यांना मारहाण सुरु केली. तिथे असलेले एक लाकूड उचलून त्याने शिंदे यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. शिंदे रक्ताच्या थारोळयात तिथे कोसळले. ते पाहून भेदरलेला दुचाकीस्वार तिथून पसार झाला.
गंभीर अवस्थेत त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला गंभीर मार लागल्याने ते बेशुद्धअवस्थेत होते. अखेर आज बुधवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्या दुचाकीस्वाराला पोलिसांनी मालवणी येथून अटक केली.
आणखी वाचा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना विलास शंदे यांना झालेल्या माराहणीचा उल्लेख केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. त्यांनी रुग्णालयात जाऊन विलास शिंदे यांच्या कुटुंबाचीही भेट घेतली होती.
माहिती गोळा करण्याची वाहतूक पोलिसांची ही मोहिम अनेक बाईकस्वारांना पचनी पडलेली नाही. खासकरुन महिलांचा व्यक्तीगत माहिती द्यायला विरोध आहे. या मोहिमेतंर्गत वाहूतक पोलिस वाहन क्रमांक मोबाईल नंबर, नोंदवून घेत आहेत.