रेल्वेच्या शौचालयातून होते दुधाची वाहतूक!
By Admin | Published: March 10, 2016 03:58 AM2016-03-10T03:58:24+5:302016-03-10T03:58:24+5:30
आरोग्यासाठी लाभदायक असणाऱ्या दुधाची रेल्वेच्या शौचालयातून वाहतूक असल्याचे वास्तव उघड झाले आहे. गोंदियाहून सुटणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या आरक्षित डब्यातील शौचालयात दुधाचे कॅन ठेवले जातात.
गजानन चोपडे, नागपूर
आरोग्यासाठी लाभदायक असणाऱ्या दुधाची रेल्वेच्या शौचालयातून वाहतूक असल्याचे वास्तव उघड झाले आहे. गोंदियाहून सुटणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या आरक्षित डब्यातील शौचालयात दुधाचे कॅन ठेवले जातात. त्यामुळे नागपूरला पुरविण्यात येणारे हे दूध आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. विशेष म्हणजे, रेल्वे व्यवस्थापन आणि पोलिसांसमोर हा प्रकार चालतो. त्या विरोधात कोणीही आवाज उठवलेला नाही.
शौचालयातील दुधाच्या कॅनचे छायाचित्र प्रस्तुत प्रतिनिधीने काढले. ते पाहिल्यानंतरही एकही अधिकारी त्यावर बोलायला तयार नाही. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातून नागपूरसाठी दररोज १५ ते २० हजार लीटर दुधाचा पुरवठा केला जातो. गोंदिया, तिरोडा, तुमसर, वरठी स्थानकांहून दूध घेतले जाते. व्यावसायिक कोणत्याही डब्यात चढतात. जागा दिसेल तेथे दुधाचे कॅन ठेवण्यात येतात. प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये, म्हणून काही जण चक्क शौचालयात दुधाचे कॅन ठेवतात. प्रस्तुत प्रतिनिधीने शौचालयात जाऊन बघितले असता, दुधाचे दोन कॅन आढळले.
२००५ मध्ये भंडाऱ्याचे तत्कालीन खा. शिशुपाल पटले यांच्या मागणीवरून रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्र एक्स्पे्रसला दुधाची वाहतूक करण्यासाठी एक विशेष डबा जोडला आहे. आजही तो कायम आहे. मात्र, जागेनुसार आरक्षित डब्यात दुधाचे कॅन ठेवले जातात.
दुधाची वाहतूक करण्यासाठी एक डबा पुरेसा नसून, अजून एका डब्याची आवश्यकता आहे. आरक्षित डब्यातून दुधाची वाहतूक करणे हे नियमाचे उल्लंघन आहे, असे एका व्यावसायिकानेही मान्य केले.