दुचाकीस्वारांकडून वाहतूक नियम धाब्यावर

By admin | Published: July 10, 2017 02:59 AM2017-07-10T02:59:41+5:302017-07-10T02:59:41+5:30

पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये मोटारसायकलस्वारांकडून वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहेत.

Traffic rules from two-wheelers on Dham | दुचाकीस्वारांकडून वाहतूक नियम धाब्यावर

दुचाकीस्वारांकडून वाहतूक नियम धाब्यावर

Next

नामदेव मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये मोटारसायकलस्वारांकडून वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहेत. हेल्मेटचा वापर केला जात नाही. तरुणाईला स्टंटबाजीचे वेड लागले असून अपघातांमध्ये वाढ होत आहे. मोटारसायकलवर ३ ते ४ प्रवासी बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पनवेलमध्ये चक्क एक मोटारसायकलवरून सात व्यक्ती प्रवास करत असल्याचेही पाहवयास मिळाले असून, नियम धाब्यावर बसविणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.
नवी मुंबई व पनवेल परिसरामध्ये बेशीस्तपणे मोटारसायकल चालविणाऱ्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. आयुक्तालय क्षेत्रामध्ये तब्बल ३ लाख ७४ हजार मोटारसायकल आहेत. २०१६-१७ या वर्षामध्ये नवी मुंबईमध्ये ३२९२७ मोटारसायकलची खरेदी करण्यात आली होती. पनवेलमध्ये ३३१५९ मोटारसायकल खरेदी केल्याची नोंद झाली होती. प्रत्येक वर्षी दोन्ही शहरांमध्ये मिळून ५० ते ६० हजार नवीन मोटारसायकलची खरेदी होऊ लागली आहे. वाढणाऱ्या मोटारसायकलचा वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होऊ लागला आहे. पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. वाहतूक पोलिसांनी नो पार्किंगसाठी केलेल्या कारवाईमध्ये मोटारसायकलची संख्याच सर्वात जास्त आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांमध्येही मोटारसायकलस्वारच आघाडीवर आहेत. सर्रासपणे ३ ते ४ जणांना बसवून वाहने चालवितानाचे चित्र पाहवयास मिळत आहे. ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये शनिवारी पनवेल एसटी डेपोसमोर एक मोटारसायकलवर चक्क ७ प्रवासी बसले असल्याचे चित्र पाहवयास मिळाले. मोटारसायकलचालक, दोन महिला व चार मुलांना घेऊन मुख्य रोडवरून मोटारसायकल चालविणाऱ्या या व्यक्तीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. विशेष म्हणजे, चालकाने हेल्मेटचाही वापर केला नव्हता. दुर्दैवाने या मोटारसायकलचा अपघात झाला असता, तर जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात होती. अशाप्रकारे नियम धाब्यावर बसविणाऱ्यांवर पोलिसांनीही कारवाई केली नाही.
नवी मुंबई परिसरामध्ये ७० टक्के मोटारसायकलस्वार हेल्मेटचा वापर करत नसून, पनवेल परिसरामध्ये हेच प्रमाण ९० टक्के एवढे आहे. नियम तोडणाऱ्यांना पोलिसांची भीती राहिलेली नाही. पोलीस फक्त टार्गेट पूर्ण करण्यासाठी कारवाई करत असल्याचे पाहवयास मिळत आहे. स्टंटबाजी करणाऱ्या मोटारसायकलस्वारांचे प्रमाणही वाढले आहे. पामबिच व महामार्गावर धूम स्टाइल वाहने चालविताना पूर्वी पाहवयास मिळत होते; परंतु आता अंतर्गत व रहदारीच्या रोडवरही अतिवेगाने वाहने चालविली जात आहेत. तुर्भेमध्ये मे महिन्यामध्ये धूम स्टाइल मोटारसायकल चालविणाऱ्याने धडक दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे वार्डाध्यक्ष ज्ञानेश्वर वाळुंज यांचा मृत्यू झाला होता. मोटारसायकलस्वारांना कायद्याची भीती राहिलेली नसून पोलिसांनी नियमित व निष्पक्षपणे कारवाई केली तरच शिस्त लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
>पोलीसही तोडतात नियम
आयुक्तालय क्षेत्रामध्ये मोटारसायकलस्वार नियम धाब्यावर बसवत असून यामध्ये पोलीसही अपवाद नाहीत. वाहतूक व पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस मोटारसायकल चालविताना हेल्मेटचा वापर करत नाहीत. अनेक वेळा रोडच्या विरूद्ध दिशेन वाहने चालवत असल्याचे पाहवयास मिळत आहे. पोलीसच नियमांचे पालन करत नसतील तर सामान्य नागरिक कसे पालन करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
स्टंटबाजी बेतते जीवावर
मोटारसायकलस्वारांमध्ये स्टंटबाजी करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. महाविद्यालयीन मुले स्पोर्ट बाइक व गिअर नसलेल्या दुचाकी धूम स्टाइल चालविल्या जात आहेत. पामबिच रोड महामार्गाबरोबर आता अंतर्गत रोडवरही रेसिंग सुरू झाले आहे.
२८ मे रोजी तुर्भेमधील राष्ट्रवादी काँगे्रसचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर वाळुंज यांना धूम स्टाइल मोटारसायकल चालविणाऱ्यांनी धडक दिली. अपघात एवढा गंभीर होता की त्यामध्ये वाळुंज यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.

Web Title: Traffic rules from two-wheelers on Dham

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.