रेल्वे वाहतूक सेवा 24 तासांहून अधिक काळ विस्कळीत, डाऊन लाइन आजही बंद राहण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 06:27 PM2017-09-08T18:27:56+5:302017-09-08T22:31:26+5:30
गुरुवारी दुपारी मालगाडीचे सहा डबे घसरल्याने खंडाळा गावाजवळ विस्कळीत झालेली रेल्वेची वाहतूक 24 तासांहून अधिक काळ विस्कळीतच आहे. गुरुवार रात्रभर काम केल्यानंतर पुण्याहून मुंबईकडे जाणारी अप लाइन व मिडल लाइन सुरू करण्यात आली असली तरी मुंबई, पुणे ही डाऊन मार्गावरील वाहतूक आज दिवसभर बंदच होती.
लोणावळा, दि. 8 - गुरुवारी दुपारी मालगाडीचे सहा डबे घसरल्याने खंडाळा गावाजवळ विस्कळीत झालेली रेल्वेची वाहतूक 24 तासांहून अधिक काळ विस्कळीतच आहे. गुरुवार रात्रभर काम केल्यानंतर पुण्याहून मुंबईकडे जाणारी अप लाइन व मिडल लाइन सुरू करण्यात आली असली तरी मुंबई, पुणे ही डाऊन मार्गावरील वाहतूक आज दिवसभर बंदच होती. गुरुवारी मालगाडीचे डबे घसरल्याने अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आल्याने गुरुवार व शुक्रवार दोन्ही दिवस प्रवाशांचे हाल झाले.
मध्य रेल्वेच्या मुंबई पुणे डाऊन लाइनवरून पुण्याच्या दिशेने निघालेली मालगाडी ही गुरुवारी दुपारी खंडाळा बोगद्यातून बाहेर निघाल्यानंतर किमी 123 व 124 दरम्यान आली असता अचानक झालेल्या ब्रेक डाऊनमुळे सहा डबे रुळावरून घसरले. या अपघातात एक डबा हा मिडल लाइनवर गेला तर मालाने भरलेल्या इतर डब्यांमुळे जवळपास शंभर ते दीडशे मीटर अंतरापर्यंत स्लिपर तुटले गेले, रेल्वे रूळ तुटले काही वाकडे झाले, विजेचे खांब तुटून पडल्याने मुंबई पुणे मार्गावरील डाऊन, अप व मिडल या तिन्ही लाईनवरील वाहतूक गुरुवारी पूर्णतः ठप्प झाली होती.
अपघाताची माहिती समजल्यानंतर रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत रेल्वे मार्ग सुरू करण्याचे काम हाती घेत शुक्रवारी सकाळी रेल्वे मार्गावरील अप व मिडल या दोन लाईन सुरु केल्या. आज शुक्रवारी दुपारी 12.40 वाजता मालगाडीचे रुळावरुन सरकलेले डबे सहा इंजिनच्या सहाय्याने लोणावळा शेडमध्ये ओढून नेण्यात आले. यानंतर रेल्वे कामगारांचे हजारो हात एकाच वेळी खंडाळा रेल्वे गेट ते खंडाळा बोगदा दरम्यान तुटलेले खराब झालेले स्लिपर व रेल्चे रुळ बदलण्याचे काम करण्यासाठी झटले होते. वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी, कंत्राटदार, मुकादम यांची टीम कामगारांकडून काम करून घेत होती. मात्र मोठ्या प्रमाणात स्लिपर्स तुटल्याने आज रात्री देखील डाऊन लाईन बंदच राहण्याची शक्यता आहे.