आता ट्रॅफिक सिग्नलही धावणार!
By admin | Published: May 9, 2017 01:51 AM2017-05-09T01:51:45+5:302017-05-09T01:51:45+5:30
कधीही न थांबणाऱ्या मुंबई शहरात आता ‘ट्रॅफिक सिग्नल’ही धावणार आहेत. शहरात सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कधीही न थांबणाऱ्या मुंबई शहरात आता ‘ट्रॅफिक सिग्नल’ही धावणार आहेत. शहरात सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडीची समस्या उद्भवते. ही वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांना १३ फिरत्या ट्रॅफिक सिग्नलची मदत होणार आहे.
शहरात सध्या सुरू असलेली मेट्रोची कामे, आयपीएल सामने, विविध जनआंदोलने, यामुळे वाहतूक सुरळीत राखताना, मुंबई वाहतूक पोलिसांची तारांबळ उडते. त्यातच वाहतूक पोलिसांच्या कमतरतेमुळे मुंबईतील वाहतूककोंडी हे एक न सुटणारे कोडे बनू पाहत आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात १३ फिरते ट्रॅफिक सिग्नल दाखल करण्यात आले आहेत. आगामी मान्सूनमध्ये या फिरत्या ट्रॅफिक सिग्नलची परीक्षा आहे. फिरत्या ट्रॅफिक सिग्नलचा प्रयोग २०११ साली चेन्नईत करण्यात आला होता. मुंबई शहरात २ हजार किमी लांबीचे रस्ते मार्ग आहेत. या रस्त्यांवर १२०० कायमस्वरूपी ट्रॅफिक सिग्नल कार्यरत आहेत. शहरात नोंदणीकृत २८ लाख वाहने आहेत. यापैकी १३ लाख दुचाकी आणि आठ लाखांहून जास्त चारचाकी व उर्वरित अन्य वाहने आहेत. वाहनांच्या नोंदणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने, आगामी काळात वाहतुकीचा प्रश्न गंभीर होणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे मुंबईतील वाहतूककोंडीवर फिरते ट्रॅफिक सिग्नल प्रभावी ठरतील, असा विश्वास मुंबईकरांनी व्यक्त केला आहे.
तंत्रज्ञानाचा
वापर योग्य
तंत्रज्ञानाचा वापर करून जटिल समस्यांचे निवारण करता येते. फिरत्या ट्रॅफिक सिग्नलमुळे वाहतूक पोलिसांना वाहतूककोंडी सोडवण्यासाठी निश्चित मदतच होणार असल्याचे पोलीस उपायुक्त संजय जाधव (वाहतूक उपनगर) यांनी सांगितले.