‘सहली’तून गांजाची तस्करी
By admin | Published: March 23, 2017 03:10 AM2017-03-23T03:10:16+5:302017-03-23T03:10:16+5:30
अमलीपदार्थाच्या तस्करीसाठी तस्कर, विक्रेते, ग्राहक नानाविध शक्कल लढविताना दिसतात. अशातच ‘बिहार ते मुंबई विनामूल्य सहली’चा नवा मार्ग
मुंबई : अमलीपदार्थाच्या तस्करीसाठी तस्कर, विक्रेते, ग्राहक नानाविध शक्कल लढविताना दिसतात. अशातच ‘बिहार ते मुंबई विनामूल्य सहली’चा नवा मार्ग तस्करीसाठी वापरण्यात येत असल्याचे अमलीपदार्थविरोधी पथकाने (एएनसी) केलेल्या कारवाईतून उघड झाले. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे; तर अल्पवयीन मुलीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
मुंबईत मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होत असल्याची माहिती अमलीपदार्थविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार अमलीपदार्थविरोधी पथकाचे शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सापळा रचण्यात आला आणि एका गाडीतून आलेल्या सात जणांना ताब्यात घेतले. यामध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश होता. त्यांच्या चौकशीत या विनामूल्य सहलीमागच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला.
यामध्ये मुंबईचे रहिवासी असलेल्या तस्कर कुमार अहमद (४०), रे रोड येथील टॅक्सीचालक मोहम्मद आरीफ (२९), मुन्ना कुमार (३४), मुकेश सिंग यांच्यासह बिहारचे कुटुंब पप्पू सिंग, पत्नी रिंकू सिंग यांच्यासह १५ वर्षांच्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत तब्बल ११० किलो गांजा जप्त केला आहे.
अहमद हा यामागील मुख्य सूत्रधार आहे. त्याचे आंतरराज्यीय जाळे पसरलेले आहे. तीन वर्षांपूर्वी त्याला घाटकोपर पोलिसांनी गांजा तस्करीप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर तो जामिनावर बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्याने ही अनोखी शक्कल लढविली. मुळात प्रवासादरम्यान एखाद्या कुटुंबावर पोलिसांना संशय येत नाही. त्यामुळे त्याने बिहार ते मुंबई विनामूल्य सहलीचा मार्ग निवडला. यामध्ये तो बिहारमधील कुटुंबांना मुंबईच्या मोफत प्रवासाची माहिती देत असे. मुंबईचे आकर्षण असलेली मंडळी त्यासाठी तयार होत होती. तो गरजू तसेच लहान मुलांचा समावेश असणारी कुटुंबं हेरायचा. अहमदच्या आदेशाने विविध ठिकाणी विखुरलेले तस्कर कुटुंबाच्या शोधात निघायचे. त्यानुसार एकावेळी सहा ते सात कुटुंब हेरायचे. तेथील चालक, वाहनांची सोय होताच आंध्र प्रदेश, ओडिशा येथील विक्रेत्यांकडून तो हा गांजा मुंबईत पुरवठा करायचा.
यात प्रवास करणारे कुटुंब मात्र वाहनात गांजा आहे याबाबत अनभिज्ञ असायचे. त्यांना याची माहिती कळू नये म्हणून प्रवासादरम्यान या रॅकेटमधील मंडळी सतत एअरफ्रेशनरचा मारा करीत असत. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सिंग कुटुंबीयांना याची माहिती होती की नाही याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे अमलीपदार्थविरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी सांगितले. या कारवाईपूर्वी या रॅकेटने १५ दिवसांपूर्वी मुंबईत अशाच प्रकारे गांजाची तस्करी केली होती. यापूर्वी या लोकांकडून आणखी किती आणि कुठे गांजाची विक्री करण्यात आली. याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती लांडे यांनी दिली. (प्रतिनिधी)