पुणे-नगरची कोंडी सोडविण्यासाठी ट्रॅफिकप्लॅन : विश्वास नांगरे-पाटील
By admin | Published: April 7, 2017 01:04 AM2017-04-07T01:04:16+5:302017-04-07T01:04:16+5:30
पुणे-नगर महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी रस्त्याचा सर्व्हे करून ‘ट्रॅफिक प्लॅन’ करण्यात येणार आहे.
कोरेगाव भीमा/शिक्रापूर : पुणे-नगर महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी रस्त्याचा सर्व्हे करून ‘ट्रॅफिक प्लॅन’ करण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक विषयातील तज्ज्ञ प्रताप भोसले यांची मदत घेतली जाईल, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली.
शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १६ गुन्हेगारांवर तडीपारीचा प्रस्ताव सादर केला आहे. कॉलेजबाहेर बुलेटचा आवाज काढून मुलींना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. शिक्रापूर पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी व आय जी शंभर या ग्रुपमधील सदस्यांची बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे, पंचायत समितीच्या उपसभापती मोनीक हरगुडे, जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, पंचायत समिती सदस्या सविता पऱ्हाड, माजी सदस्या दीपाली शेळके, सणसवाडीच्या सरपमच वर्षा कानडे, कोरेगाव भीमाच्या सरपंच अनिता भालेराव, सणसवाडीचे उपसरपंच बाबासाहेब दरेकर, जिजामाता बँकेचे संचालक पंडित दरेकर, ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष रमेश टाकळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या वेळी विश्वास नांगरे-पाटील यांनी पुणे-नगर महामार्गावरील वाहतुकीस कारणीभूत असणाऱ्या दुचाकी-चारचाकी उचलून पोलीस ठाण्यात नेण्यासाठी क्रेनच्या निविदा मागविण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांना दिल्या. रस्तादुभाजक तोडल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व चोऱ्यांसह वाहतूक नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना देऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सीसीटीव्ही बसवून त्याची लिंक पोलीस ठाण्याला बसविण्याची सूचना करण्यात आली.
प्रत्येक नागरिकाची सुरक्षेची जबाबदारी आमची आहेच. महामार्गावर, प्रत्येक गावात, महाविद्यालय परिसरात, प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभे राहणे गरजेचे आहे. ९८ टक्के सुजाण नागरिकांचा सपोर्ट ग्रुप आमच्या आमच्या पाठीशी राहिला तर पोलिसांचे काम सक्षम होईल, असे प्रतिपादन कोल्हापूर विभागाचे पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केले.
खासगी वेशातील पोलीस तयार करा
शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झाल्याने नागरीकरणातही वाढ झाली आहे. त्याप्रमाणात पोलीस कर्मचाऱ्यांचे संख्याबळ अपुरे असल्याने खासगी वेशातील पोलीस नागरिकांमधून तयार करण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांना विश्वास नांगरे यांनी सूचना दिल्या.