कल्याणात कचोरे येथे दरड कोसळली
By admin | Published: September 19, 2016 03:33 AM2016-09-19T03:33:56+5:302016-09-19T03:33:56+5:30
नेतीवली टेकडी असो अथवा कचोरे याठिकाणी दरड कोसळण्याचा सिलसिला यंदाही कायम आहे.
कल्याण : नेतीवली टेकडी असो अथवा कचोरे याठिकाणी दरड कोसळण्याचा सिलसिला यंदाही कायम आहे. रविवारी दुपारी एकच्या सुमारास कचोरे हनुमाननगर परिसरातील टेकडीवरील दरड कोसळल्याची घटना घडली. यात सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही. भले मोठे दगड घरंगळत खाली कोसळूनही ते एका घराजवळ येऊन थांबले.
कचोरे येथील टेकडीवर आणि पायथ्याशी मोठया प्रमाणावर कुटुंबांचे वास्तव्य असून यात कुष्ठरूग्णांच्या १७० कुटुंबांचा समावेश आहे. रविवारी दुपारी अचानक दरड कोसळल्याची घटना घडली. तीन ते चार दगड घरंगळत खाली आले. परंतु यात कुणालाही दुखापत झाली नाही किंवा मालमत्तेचे नुकसान झाले ेनाही. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी आणि त्यांचे पती राजन चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. ड प्रभागाचे प्रभाग अधिकारी शांतीलाल राठोड आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या जागेची पाहणी केली. यात दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेता त्याठिकाणच्या कुटुंबांना घरे रिकामी करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान दोन वर्षापूर्वी याठिकाणी दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला होता.
कचोरे-नेतीवली धोका कायम
कचोरेप्रमाणे नेतीवली टेकडीवरील दरड कोसळण्याचा धोका पावसाळयात कायम असतो. परिणामी या परिसरातील शेकडो कुटुंबांना जीव मुठीत धरूनच वास्तव्य करावे लागते. दरड कोसळून झालेल्या अपघातांचा आढावा घेता २००९ मध्ये नेतीवली येथे दरड कोसळून एका मुलाचा मृत्यू झाला होता. तर ५ वर्षापूर्वी तिघांचा मृत्यू तर ६ जण जखमी झाल्याची घटना घडली होती. मार्च २०१४ मध्येही जयभवानीनगर परिसरात घडलेल्या घटनेत दरड कोसळून ७ जखमी झाले.
दोन वर्षापूर्वी कचोरे येथे एकाला आपले प्राण गमवावे लागले होते. आॅगस्ट २०१५ मध्येही सूचकनाका परिसरातील महात्मा फुले नगरमध्ये दरड कोसळल्याची घटना घडली. याठिकाणी असलेल्या पठाण चाळीतील एका घरावर मोठ-मोठे दगड पडल्याने या घराच्या पाठीमागील भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. रविवारच्या घटनेत सुदैवाने जीवित किंवा वित्तहानी झालेली नसली तरी शेकडो कुटुंबीयांच्या मनातील भीतीचे सावट यंदाही जैसे थे असल्याचे समोर आले आहे.