टे्रलरची धडक; पोलिसाचा मृत्यू
By admin | Published: November 20, 2015 01:34 AM2015-11-20T01:34:50+5:302015-11-20T05:39:01+5:30
भरधाव वेगाने निघालेल्या टे्रलरच्या धडकेत एक पोलीस शिपाई जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना वडाळ्यात घडली. या ट्रेलरने सात टॅक्सींनाही धडक दिली.
मुंबई : भरधाव वेगाने निघालेल्या टे्रलरच्या धडकेत एक पोलीस शिपाई जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना वडाळ्यात घडली. या ट्रेलरने सात टॅक्सींनाही धडक दिली. या अपघातात या टॅक्सींचा अक्षरश: चुराडा झाला. या प्रकरणी टे्रलर चालक गजेंद्रकुमार सुखदेव सिंग (४४) याला अटक करण्यात आली आहे.
संजीव तुकाराम पाटील (५२) असे या घटनेतील मृत पावलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. पाटील हे अॅण्टॉप हिल पोलीस ठाण्यात कार्यरत होते. वडाळा येथील गणेश नगर परिसरात ते वास्तव्यास होते. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी ८च्या सुमारास जॉगिंगसाठी ते घराबाहेर पडले. एसपी रोड परिसरात जॉगिंग करत असताना, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या टे्रलरखाली ते चिरडले गेले. त्यानंतर रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या सात टॅक्सींना उडवून टे्रलर उलटला.
स्थानिकांच्या मदतीने पाटील यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा झाडखंड येथील रहिवाशी असलेला सिंग, सकाळी नवी मुंबईतील कळंबोली येथून टे्रलर घेऊन मुंबईकडे येण्यासाठी निघाला होता.
सकाळची वेळ असल्याने, तसेच मोकळा रस्ता असल्याने, तो टे्रलर भरधाव वेगाने नेत होता. वडाळा स्थानकादरम्यान त्याचा टे्रलरवरचा ताबा सुटून हा अपघात घडला. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक परशुराम कार्यकर्ते यांनी सांगितले. (प्रतिनिधी)