मुंबई - पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक ११ ऑगस्टपर्यंत राहणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 04:51 PM2019-08-08T16:51:23+5:302019-08-08T16:51:58+5:30
मुसळधार पावसामुळे रात्री मंकी हिलजवळ दरड कोसळली आहे...
पुणे : घाट क्षेत्रात मंकी हिलजवळ रेल्वेमार्गावर कोसळलेली दरड काढण्यास आणकी तीन-चार दिवस लागणार असल्याने पुणे-मुंबईदरम्यानचीरेल्वे वाहतुक रविवार (दि. ११) पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. कोल्हापुरला जाणाऱ्या महालक्ष्मी व सह्याद्री एक्सप्रेससह लांबपल्याच्या काही गाड्याही रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
मुसळधार पावसामुळे शनिवारी (दि. ३) रात्री मंकी हिलजवळ दरड कोसळली आहे. तेव्हापासून पुणे-मुंबईदरम्यानची रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. दोन्ही शहरांदरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी व इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्या धावलेल्या नाहीत. तसेच प्रगती व डेक्कन एक्सप्रेस या गाड्या यापुर्वीच रद्द करण्यात आल्या होत्या. या मार्गावर एकही रेल्वेगाडी न धावल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यातच आता रेल्वेकडून रविवारपर्यंत या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे प्रवाशांना मुंबईला ये-जा करण्यासाठी एसटी बस तसेच खासगी वाहनांशिवाय पर्याय नाही. इंटरसिटी गाड्यांप्रमाणे लांबपल्याच्या अनेक गाड्या रद्द तर काही गाड्यांचे मार्ग वळविण्याचा आणि काही गाड्या अंशत: रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
रद्द न केलेल्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या काही रेल्वेगाड्या पुण्यापर्यंत धावणार आहेत. तर काही गाड्यांना दौंड ते मुंबईदरम्यान रद्द करण्यात आले आहे. या गाड्या पुणे किंवा दौंड स्थानकातून नियमित वेळेनुसार सोडण्यात येतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
-----------
रविवारपर्यंत रद्द गाड्या
- डेक्कन क्वीन
- इंद्रायणी एक्सप्रेस
- सिंहगड एक्सप्रेस
- इंटरसिटी एक्सप्रेस
- पुणे-पनवेल-पुणे पॅसेंजर
- सोलापुर-मुंबई-सोलापुर सिध्देश्वर एक्सप्रेस
- मुंबई-पंढरपुर-मुंबई पॅसेंजर
- मुंबई-कोल्हापुर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस
- कोल्हापुर-मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस
- हुबळी-मुंबई एक्सप्रेस
- हैद्राबाद-मुंबई हैद्राबाद एक्सप्रेस
- मुंबई-कोल्हापुर महालक्ष्मी एक्सप्रेस (दि. १२ पर्यंत)
- मुंबई-चेन्नई-मुंबई एक्सप्रेस (दि. १० पर्यंत)
----------------
इतर दिवशी रद्द गाड्या
दि. ९ : पुणे-निझामुद्दीन एक्सप्रेस, विजापुर-मुंबई पॅसेंजर, लातुर-मुंबई एक्सप्रेस, निझामुद्दीन-पुणे एक्सप्रेस, इंदौर-पुणे-इंदौर एक्सप्रेस,
दि. १० : ग्वाल्हेर-पुणे एक्सप्रेस, बिदर-मुंबई एक्सप्रेस, पुणे-इंदौर एक्सप्रेस, जयपुर-पुणे एक्सप्रेस, मुंबई-चेन्नई एक्सप्रेस
दि. ११ : पुणे-ग्वाल्हेर एक्सप्रेस, लातुर-मुंबई-लातुर एक्सप्रेस, पुणे-निझामुद्दीन एक्सप्रेस, पुणे-जयपुर एक्सप्रेस
-----------------