रेल्वेची गाडी येतेय रुळावर !
By admin | Published: January 5, 2015 12:52 AM2015-01-05T00:52:22+5:302015-01-05T00:52:22+5:30
मागील १२ दिवसांपासून दाट धुके पडल्यामुळे विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक पूर्वपदावर येत असून, रविवारी फक्त पाच रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत होत्या.
प्रवाशांना दिलासा : रविवारी फक्त पाच गाड्या ‘लेट’
नागपूर : मागील १२ दिवसांपासून दाट धुके पडल्यामुळे विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक पूर्वपदावर येत असून, रविवारी फक्त पाच रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत होत्या. यामुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
दिल्ली आणि इतर मार्गावर दाट धुके पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा ४ ते १८ तास विलंबाने धावत होत्या. लोकोपायलटला सिग्नल दिसत नसल्यामुळे विविध मार्गावरील रेल्वेगाड्या जागेवरच ठप्प झाल्या होत्या. यामुळे या गाड्यांची वाट पाहणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होऊन त्यांना ताटकळत रेल्वे स्थानकावर बसण्याची पाळी आली होती. यामुळे रेल्वे स्थानकावरील वेटिंग रूमही फुल्ल झाल्या होत्या. परंतु रविवारी यातील अनेक रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेवर पोहोचल्यामुळे या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला. दरम्यान, रविवारी फक्त पाच रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत होत्या. या रेल्वेगाड्यात १२७२४ नवी दिल्ली-हैदराबाद एपी एक्स्प्रेस १०.३० तास, १२६१६ नवी दिल्ली-चेन्नई जीटी एक्स्प्रेस १५ तास, १२२९६ पाटणा-बंगळुरू संघमित्रा एक्स्प्रेस ५ तास, १२७२३ हैदराबाद-नवी दिल्ली एपी एक्स्प्रेस ७ तास आणि १२७२२ हजरत निजामुद्दीन-हैदराबाद दक्षिण एक्स्प्रेस २.३० तास उशिराने धावत आहे. आगामी काही दिवसांत या गाड्यांच्या वेळापत्रकातही सुधारणा होणार असल्याचा अंदाज रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. (प्रतिनिधी)